शासनाकडून मागण्या मान्य करून घेणार

By admin | Published: June 26, 2017 12:41 AM2017-06-26T00:41:18+5:302017-06-26T00:41:36+5:30

स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

The government will accept the demands | शासनाकडून मागण्या मान्य करून घेणार

शासनाकडून मागण्या मान्य करून घेणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला /पिंपळगाव बसवंत : दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी केली म्हणजे सर्व काही झाले असे सरकारने समजू नये. अन्य शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करावी, जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा त्यात समावेश करावा, शेतमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या आम्ही शासनाच्या मानगुटीवर बसून मान्य करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील येवला, पिंपळगाव बसवंत, निफाड येथील दौऱ्याप्रसंगी दिली.कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवसेनेतर्फे रविवारी येवला शहरातील आसरा लॉन्स येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओझरपासून येवल्यापर्यंतच्या पट्ट्यातील शेतकरी आंदोलनाच्यावेळी रस्त्यावर उतरला आणि सरकारला आपली ताकद दाखवून दिली. या एकजुटीच्या जोरावर सरकार झुकले. म्हणूनच या बहादूर शेतकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे. कर्जमाफीचा नाशिक जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यात असंतोष आहे याची आपणास जाणीव आहे. असेही ते म्हणाले. सरकारने मार्च २०१६ पर्यंतच्या कर्जाबाबत निर्णय घेतला. पण मार्च २०१७ अखेरच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यास सरकारला आम्ही भाग पाडू. केवळ कर्जमुक्ती नाही तर, कांदा पिकासह अन्य शेतमालाला हमी भाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी करणे महत्वाचे असून शासनाला ती करावीच लागेल असेही ठाकरे यांनी नमूद केले.  यावेळी व्यासपीठावर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार अनिल कदम, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजी पवार यांच्यासह शिवसेना नेते उपस्थित होते. प्रास्तविक दराडे यांनी तर स्वागत पवार यांनी केले.कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख वाल्मिक गोरे, तालुका प्रमुख झुंजार देशमुख, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, कुणाल दराडे, माजी नगरसेवक संजय कासार बाळासाहेब पिंपरकर, कांतीलाल साळवे, पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे, छगन आहेर, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड मंगेश भगत, साहेबराव सैद, रतन बोरनारे, यांच्यासह शिवसैनिक व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारला जाब विचारा
च्दुष्काळाने जर्जर झालेला शेतकरी गारपिटीत सापडला, त्यानंतर नोटाबंदीच्या फंड्यात शेतकऱ्यांची रोकड थांबली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. जिल्हा बँकेत राजकारण आणून चेअरमन नरेंद्र दराडे यांना केवळ बदनाम केले गेले. चुका झाल्या असतील तर त्यांना पकडण्याची हिंमत दाखवा असे सांगतानाच जिल्हा बँकेत पडून राहिलेल्या पैशांचे व्याज कोण देणार? याचा जाब सरकारला विचारण्याचा आदेशच उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र दराडे यांना भाषणातून दिला.
शेतकरी गुन्हेगार असतील
तर सेना त्यांच्यासोबतच !
शेतकऱ्यांना जर गुन्हेगार ठरवणार असाल तर, याच गुन्हेगारांबरोबर सेना आहे. पिंपळगावसह अन्य भागात झालेल्या शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे न घेतल्यास सेनेचा हिसका दाखवू असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांची यादीच सभेत मागवून ही यादी सरकारकडून रद्द करून घेणारच असा शब्द सभेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सरकार सरळ न्याय देणार नसेल तर, दुसरी भाषा बोलावी लागेल. न्याय हक्क मिळवून देण्यासाठीच सेना आहे हा बाळासाहेबांचा शब्द खरा करवून दाखविण्याची गर्जनाही ठाकरे यांनी सभेत केली.

Web Title: The government will accept the demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.