शासकीय कामकाज आठवडाभर ठप्प
By admin | Published: February 23, 2017 12:28 AM2017-02-23T00:28:30+5:302017-02-23T00:28:43+5:30
शासकीय कामकाज आठवडाभर ठप्प
नाशिक : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपूर्ण शासकीय यंत्रणा गुंतून पडल्यामुळे व लागोपाठ तीन दिवस शासकीय सुटी आल्याने चालू आठवड्यात शासकीय कामकाज पूर्णत: ठप्प होणार आहे. नाशिक महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांचे बळ प्रशासनाला उभे करावे लागले असून, त्यासाठी प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कार्यालयांचीही मदत घेण्यात आली आहे. विशेष करून जिल्हा परिषद, महापालिका, महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांचाच यात अधिक भरणार असल्याने या निवडणूक कामांमुळे त्यांच्या दैनंदिन शासकीय कामांवर यापूर्वीच परिणाम झालेला असताना चालू आठवडा तर शासकीय कामकाज बाजूला ठेवून त्यांना फक्त निवडणूक कामांनाच प्राधान्य द्यावे लागले आहे. जिल्ह्यात मंगळवारी मतदान घेण्यात आले असले तरी, सोमवारी सकाळी या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण आटोपल्यानंतर दुपारनंतर हेच अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह थेट मतदान केंद्रावर रवाना झाले. मंगळवार पूर्ण दिवस व रात्री उशिरापर्यंत हे कर्मचारी मतदान प्रक्रियेत व्यस्त असल्यामुळे बुधवारी शासकीय कार्यालयांमध्ये अगदीच अल्प उपस्थिती होती. मात्र गुरुवारी पुन्हा शासकीय अधिकारी व कर्मचारी महापालिका, जिल्हा परिषदेच्या मतमोजणीत व्यस्त राहणार असल्यामुळे शासकीय कार्यालये पुन्हा ओस पडणार आहेत.