सरकारचं चुकलं...! आमचा दोष काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:55 PM2017-10-17T23:55:55+5:302017-10-18T00:12:19+5:30
तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
नाशिक : तुटपुंज्या वेतनाला कंटाळून एसटी कर्मचाºयांनी पंधरवड्यापूर्वी संपाची हाक दिली होती, तर सरकारने व परिवहन मंत्रालयाने यावर तोडगा काढून सणासुदीच्या काळात संप टाळायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि राज्यात चालक-वाहकांवर संपाची वेळ आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. याप्रकरणी प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त करीत चूक सरकारची मात्र शिक्षा प्रवाशांना का? असा संतप्त सवाल उपस्थित केला. सातवा वेतन आयोग लागू करून सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक-वाहकांना आर्थिक सुबत्ता मिळवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हजारो चालक-वाहकांनी मंगळवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून संप पुकारला. यामुळे दिवसभर प्रवाशांचे हाल झाले. बसस्थानकांना जणू आगाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. मोठ्या संख्येने बसेसच्या रांगा लागल्या होत्या. खासगी ट्रॅव्हल्सचा आधार नागरिकांना शहराबाहेर जाण्यासाठी घ्यावा लागला. यावेळी अव्वाच्या सव्वा दराच्या आकारणीचा धोका वाढला होता; मात्र प्रादेशिक परिवहन विभाग, महामंडळ व चौधरी यात्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने एसटी भाड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी भाड्यात प्रवासी वाहतूक उपलब्ध झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला. सकाळपासूनच संपाची धार तीव्र असल्यामुळे दिवसभर नागरिकांची विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व पासधारकांची मोठी गैरसोय झाली. सरकारने तातडीने तोडगा काढून एस.टी. कर्मचाºयांचा संप मिटवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. दिवाळीच्या हंगामात ‘एसटी’ची डबल बेल पडली नाही तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संप मिटविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मी नेवासा येथे मूळगावी जाण्यासाठी दोन तासांपासून महामार्गावर थांबून राहिलो; मात्र उपयोग झाला नाही. सरकारने संप सणासुदीचा काळ लक्षात घेऊन टाळायला हवा होता. सरकारची भूमिका चुकली. - नीलेश वाघमारे
दीड तास झाला वसईला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होते. संप असल्याचे माहिती नाही; मुलीलाही काळजी लागून आहे. कर्मचाºयांनी संयम दाखवावा, तर सरकारने संप लवकर मिटवावा. -मालतीबाई वसईकर
कामगारांनी संप पुकारला ते त्यांच्या जागी योग्य आहेत व नागरिकाही त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. सरकारने सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून संपाबाबत तोडगा काढायला हवा. - ऐश्वर्या बागुल