पथदीपांचे देयके सरकारने भरण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 11:40 PM2021-07-14T23:40:26+5:302021-07-15T01:01:35+5:30
निफाड : येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (दि. १४) तालुक्यातील ९७ गावांतील सरपंच व उपसरपंच यांची पथदीप थकीत बिले व १५वा वित्त आयोग या विषयावर बैठक संपन्न झाली. यावेळी पथदीपांचे देयके पूर्वीप्रमाणेच केंद्र व राज्य शासनाने भरण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.

माजी पंचायत समिती सभापती शिवा सुराशे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या पथदीपांचा वीजपुरवठा थकबाकी बिलांमुळे वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे, त्यामुळे पथदीपांचे हे देयक पूर्वीप्रमाणेच केंद्र व राज्य शासनाने भरावे, १५व्या वित्त आयोगाचा निधी गावठाणासाठी ५० टक्के, तर वस्त्यांसाठी ५० टक्के असा विभागून खर्च करण्यास परवानगी मिळावी, तालुक्यातील काही ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची मनमानी सुरू आहे, त्यावर पंचायत समितीने नियंत्रण ठेवावे, या विषयावर चर्चा करून ठराव समंत करण्यात आले.
बैठकीनंतर वरील मागण्यांबाबत निफाडच्या नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. बैठकीस पंचायत समितीच्या सभापती सुलभा पवार, उपसभापती गयाबाई सुपनर, दिलीप सूर्यवंशी, शंकर संगमनेरे, नंदू पवार आदींसह तालुक्यातील ९७ गावांतील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते,