कपाट क्षेत्राबाबत शासनाचाही बिल्डरांना दणका
By Admin | Published: May 14, 2015 12:19 AM2015-05-14T00:19:06+5:302015-05-14T00:22:31+5:30
राज्यमंत्र्यांकडे बैठक : गौण फेरबदलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
नाशिक : इमारतींमध्ये नियमबाह्य कपाट क्षेत्र बांधकामप्रकरणी नामोहरम करणाऱ्या महापालिकेच्या नगररचना विभागाविरुद्ध शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे तक्रार करत ‘कपाट’ नियमित करण्याची मागणी केली खरी, परंतु शासनानेही सदर बेकायदेशीर काम नियमित करण्याला स्पष्ट शब्दांत नकार दर्शवित महापालिकेच्या बाजूने कौल दिला. दरम्यान, शहर विकास नियंत्रण नियमावलीतील गौण फेरबदलाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यास नगरविकास विभागाने अनुकूलता दाखविली.
नाशिक महापालिकेने सन २०१२ मध्ये शहर विकास नियंत्रण नियमावलीतील गौण फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावासह नाशिक महापालिकेतील नगररचना विभागाकडून येणाऱ्या अडचणीसंबंधी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात नगरविकास खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व आमदार आणि क्रेडाईचे पदाधिकारी यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.