व्हर्टिकल फार्मिंगची अत्याधुनिकता पाहून राज्यपाल कोश्यारी प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 01:38 AM2022-01-31T01:38:25+5:302022-01-31T01:39:20+5:30
इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन विविध जातींच्या वाणांची पाहणी रविवारी (दि.३०) केली. या प्रकल्पात प्रामुख्याने सेंद्रिय हळद व मत्स्य शेतीबरोबरच एकूण ९७ पिके घेतली जातात. कोश्यारी यांनी प्रकल्पातील आधुनिक यंत्र साहित्यांची पाहणी केल्यानंतर सेंद्रिय शेती व आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन केले.
नाशिक : इगतपुरी तालुक्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मिंग शेती उत्पादन करणाऱ्या ए.एस. ॲग्री ॲण्ड ॲक्वाच्या घोटी (वाकी), ता. इगतपुरी येथील साडेसात एकरात कार्यान्वित झालेल्या कंपनीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन विविध जातींच्या वाणांची पाहणी रविवारी (दि.३०) केली. या प्रकल्पात प्रामुख्याने सेंद्रिय हळद व मत्स्य शेतीबरोबरच एकूण ९७ पिके घेतली जातात. कोश्यारी यांनी प्रकल्पातील आधुनिक यंत्र साहित्यांची पाहणी केल्यानंतर सेंद्रिय शेती व आधुनिकतेमुळे शेतकऱ्यांना उज्ज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन केले. राज्यपाल कोश्यारी यांनी तब्बल दोन तास या प्रकल्पाच्या विविध घटकांची पाहणी केली. प्रारंभी प्रकल्पाचे प्रमुख संस्थापक संचालक प्रशांत झाडे व शिरीष पारकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. देशात २० राज्यांत जवळपास १४००च्यावर असे प्रकल्प स्थापित होत असून, त्यात २८१ प्रकल्प राज्यात कार्यान्वित झाले आहेत. त्यामधून उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. यामध्ये २०० पॉलिहाऊसचे काम सुरू आहे. या प्रकल्पात आठ हजार ६०० गुंतवणूकदार असून, घोटी येथील प्रकल्पात साडेसात एकरात जवळपास ९७ पिके घेतली जात आहेत. त्यात १७ वेलवर्गीय, तर ८० पिके जमिनीतून घेतली जाणारी आहेत. या प्रकल्पात सेंद्रिय हळद मुख्य उत्पादन असून, तुलनेत १०० एकरामध्ये निघणारे उत्पादन हे या प्रकल्पात एका एकरामध्ये काढले जात आहे.
इन्फो
मत्स्य शेतीचाही प्रयोग
एएस ॲग्री ॲण्ड ॲक्वा कंपनीच्या या प्रोजेक्टमध्ये ३६ प्रकारच्या वाणाचे संशोधन झाले असून, त्यात तेलवर्गीय व दाळवर्गीय उत्पादन घेतले जात आहे. याच धर्तीवर मत्स्य शेती उत्पादन केली जात आहे. ६ फूट लांब आणि २ फूट रुंदीच्या आकाराच्या ३६ टँकमधून मत्स्य शेती केली जात आहे. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली. वेळ व पाण्याची बचत करून सेंद्रिय उत्पन्न घेणाऱ्या या सर्व प्रोजेक्टची पाहणी करताना कोश्यारी यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी प्रकल्प संस्थापक संचालक प्रशांत झाडे, कमलेश ओझे, संदीप सामंत, प्रवीण पठारे, हर्षल ओझे, वैभव कोतलापुरे, संदेश खामकर, सुरिंदर धीमन, निरंजन कडले, जयंत बांदेकर, साईनाथ हाडोळे, रोहित लोणकर, हिरेन पटेल, नवनीत तुली आदी संचालक उपस्थित होते.