राज्यपाल रमेश बैस उद्या नाशिक दौऱ्यावर; काळाराम, त्र्यंबकेश्वर मंदिराला देणार भेट!
By अझहर शेख | Published: April 25, 2023 02:54 PM2023-04-25T14:54:17+5:302023-04-25T14:54:36+5:30
त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.
नाशिक : राज्यपाल रमेश बैस यांचा बुधवारी (दि.२६) संभाव्य नाशिक जिल्हा दौरा होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रमेश बैस हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालय तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सेाहळ्यांना ते उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रवाना होतील. दर्शन आटोपल्यानंतर ते पहिने गावातील जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमस्थळी हजेरी लावणार आहेत. याठिकाणी शाळा, वाचनालयाला ते भेट देणार आहेत. कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा ते सपकाळ नॉलेज हब येथे रवाना होणार असून तेथून हेलिकॉप्टरने नाशिक शहरातील पोलिस कवायत मैदानावर त्यांचे आगमन होणार आहे. तेथून ते शासकिय विश्रामगृहाकडे रवाना होतील.
यानंतर कालिदास कलामंदिरात नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने होणाऱ्या सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर सार्वजनिक वाचनालयातील औरंगाबाद सभागृहात होणाऱ्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. हा पुरस्कार ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर आणि झी २४ तास वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक नीलेश खरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यानंतर ते पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी रवाना होतील. तेथून पुन्हा मोटारीने पोलिस कवायत मैदानावर पोहचून हेलिकॉप्टरद्वारे शिर्डीकडे प्रस्थान करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पहिने गावासह शहरातदेखील जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे पदाधिकारी, पहिने गावच्या सरपंच यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध सूचना दिल्या.