राज्यपालांनी घेतले काळारामाचे दर्शन
By धनंजय रिसोडकर | Published: January 5, 2024 03:11 PM2024-01-05T15:11:58+5:302024-01-05T15:12:51+5:30
काळारामाच्या दर्शनप्रसंगी विश्वस्त मंडळाच्या वतीने काळाराम मंदिराच्या स्थानेपासून पूर्वेतिहासाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली.
नाशिक : राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. ५) पंचवटीतील काळाराम मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून दर्शन घेतले. राज्यपालांनी काळारामाचे पूजन केल्यानंतर आरतीदेखील केली.
काळारामाच्या दर्शनप्रसंगी विश्वस्त मंडळाच्या वतीने काळाराम मंदिराच्या स्थानेपासून पूर्वेतिहासाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. याप्रसंगी त्यांनी दर्शनाने समाधान लाभल्याचे सांगितले. प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श मर्यादा पुरूषोत्तम असल्याचेही राज्यपाल रमेश बैस यांनी नमूद केले. काळाराम मंदिरात दर्शनाचे भाग्य मिळाले, मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
प्रभू श्रीरामाच्या आदर्श आचार - विचारांचा जीवनात आपण सर्वांनी अंगिकार करायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ अशिमा मित्तल यादेखील उपस्थित होत्या. तसेच काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, ॲड. अजय निकम, मंदार जानोरकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. गतवर्षी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षाच्या प्रारंभी राज्यपालांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.