गोविंदा रे गोपाळा...
By Admin | Published: August 26, 2016 12:28 AM2016-08-26T00:28:44+5:302016-08-26T00:29:03+5:30
गोविंदा रे गोपाळा...
नाशिक : शहरात विविध शाळांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला... असे गाणे म्हणत नृत्याचा फेर धरला. यावेळी सर्वांना दहीकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.
रासबिहारी शाळा
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील शिशुवृंद, प्राथमिक, आणि माध्यमिक विभागात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात झाला. शाळेतील सर्व मुले पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होती. मुलांच्या सोबतीने श्रीमती श्रेयसी राय यांनी राधे गोविंद बोलो, गाधे गोविंद बोलो हे राधा-कृष्णावर आधारित गाणे प्रस्तुत केले. के. के. वाघ कॉलेजचे फाइन आर्टचे प्रा. भूषण कोमडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. सूत्रसंचालन विजया बच्छाव हिने केले.
युनिव्हर्सल अकॅडमी
युनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल, गुलाबनगर, पंचवटी येथे गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष अर्जुन टिळे, प्रा. वैशाली टिळे, मुख्याध्यापक शैला सांगळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी राधा-कृष्णाच्या रूपात सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच कार्यक्रमाच्या गोविंदांनी नृत्यांच्या तालावर दहीहंडी जल्लोषात फोडली.
पेंग्विन इंग्लिश मीडियम स्कूल
शिवाजीनगर येथील पेंग्विन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्णाची वेशभूषा करून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. यावेळी अमोल पाटील, शाळेच्या संचालिका ज्योती पाटील, कटाळे, संचालक यश कटाळे यांनी बालगोपाळांसह दहीहंडी उत्सवात सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.
शिशुविहार शाळा
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार इंग्रजी माध्यम येथे गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. मुले राधा व कृष्णाच्या वेशभूषेत छान सजून आले होते. नर्सरीची राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धाही यानिमित्ताने घेण्यात आली होती. स्वाती देशपांडे यांनी कृष्णजन्माची माहिती व गोष्ट सांगितली. मुलांनी विविध गाण्यांवर फेर धरला. यावेळी दहीहंडी फोडण्यात आली. मुलांनी कृष्णाची गोष्ट सांगितली व गाणीही सादर केली. विभाग प्रमुख नेहा सोमण यांचे मार्गदर्शन लाभले.
व्यंकटराव हिरे प्राथमिक विद्यालय
सिडको येथील लोकनेते व्यंकटराव हिरे प्राथमिक विद्यालयात गोपाळ कालानिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेले होते. कार्यक्रमासाठी परिसरातील पालक वर्ग तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहून दहीहंडीचा कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.