एकलहरे गावात ‘शासन आपल्या गावात’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:02 AM2018-05-30T00:02:22+5:302018-05-30T00:02:22+5:30
शासन आपल्या गावात उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकलहरे गावातील मारुती मंदिरामध्ये मंगळवारी शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना सांगून सुमारे १५० रेशन कार्ड जागेवरच वितरित केले.
एकलहरे : शासन आपल्या गावात उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकलहरे गावातील मारुती मंदिरामध्ये मंगळवारी शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना सांगून सुमारे १५० रेशन कार्ड जागेवरच वितरित केले. शासन आपल्या गावात या उपक्रमांतर्गत तहसीलदार राजश्री आहिरराव व इतर अधिकारी मंगळवारी सकाळी एकलहरे गावातील मारुती मंदिरात दाखल झाले. त्यानंतर अहिरराव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या वतीने देण्यात येणारे विविध दाखले, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना आदी योजनांची माहिती दिली. तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी अर्ज भरून घेत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जागेवरच सुमारे १५० जणांना रेशन कार्ड वितरित केले. तसेच ५० हून अधिक जणांना संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड देण्यात आले. यावेळी परिसरातील रेशन दुकानदार आपले दप्तर घेउन हजर होते. ज्यांनी काही कारणास्तव अंगठे दिले नाहीत त्यांनादेखील तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांच्या संमतीने रेशनवरील धान्याचा लाभ घेता येईल, असे अहिरराव यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमाप्रसंगी पुरवठा विभागातील सुनीता पाटील, नरेंद्र ब्राहिकर, देवीदास उदार, ज्ञानेश्वर धांडे, जयश्री आहिरराव, प्रवीण पाटील, माया शिवदे, सतीश बोडके, परिघा उपासनी, सुरेश वाघ, मंडल अधिकारी सईद शेख, तलाठी संजय साळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जाधव व आभार रामदास पाटील यांनी मानले. यावेळी एकलहरा परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.