करवाढीवरून महासभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:34 AM2019-02-23T01:34:37+5:302019-02-23T01:34:59+5:30
गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली.
नाशिक : गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली. आणि कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२) झालेल्या महासभेत विरोधकांनी जाब विचारून गोंधळ घातला. हेच निमित्त करून महापौर रंजना भानसी यांनी क्षणार्थात सर्व विषय मंजूर करून महासभा गुंडाळली. यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. नगरसचिवांनीदेखील पलायन केल्याने विरोधकांनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांची खुर्ची उलटी करून त्यावर निषेधाचा मजकूर चिटकवला.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गेल्या बुधवारी (दि.२०) महासभा विरोधकांच्या आग्रहामुळेच महापौर भानसी यांनी तहकूब केली होती. त्यामुळे करवाढ रद्दच्या ठरावाची अंमलबजावणी आयुक्त का करीत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी दिलेल्या लक्षवेधीवर शुक्रवारी (दि. २२) आयोजित महासभेत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु सभागृहाचे कामकाज सुरू होताच महापौरांनी सर्व प्रथम श्रद्धांजलीच्या प्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर अभिनंदनाचे प्रस्तावदेखील पारीत झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी विषय पत्रिकेवरील नियमित विषय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी त्यांना रोखले. बोरस्ते यांनी लक्षवेधीबाबत विचारल्यानंतर महापौरांनी लक्षवेधी दाखल नसल्याचे सांगितल्याने सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले आणि पीठासनासमोर जमा झाले. करवाढ रद्दच्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हणून बघितले. परंतु, महापौरांनी ऐकले नाही त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.
महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करूनदेखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ (फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने मंजूर करून सभेचे कामकाज संपवले आणि राष्टÑगीत सुरू केले.
नगरसचिवांच्या विरोधात घोषणाबाजी
सभागृहातून बाहेर पडताच विरोधकांनी नगरसचिव यांचे दालन गाठले. परंतु नगरसचिव गोपीनाथ आव्हाळे हे तेथे नव्हते. त्यामुळे त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पळपुट्या नगरसचिवांचा धिक्कार असो, नियमानुसार कामकाज न करणाऱ्या नगरसचिवांचा निषेध असो, करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा देत नगरसेवकांनी खुर्ची उलटी केली यावेळी अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार, अपक्ष गटनेता गुरुमित बग्गा, राष्टÑवादीच्या सुषमा पगारे, सत्यभामा गाडेकर, किरण ताजणे, हर्षदा गायकर, पश्चिम प्रभाग समिती सभापती वैशाली भोसले, सीमा ताजणे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
महापालिकेच्या महासभेत विरोधकांची लक्षवेधी टाळण्यामागे राजकारण काहीच नव्हते. बुधवारी (दि.२०) महासभा तहकूब झाली ती तहकूब महासभा आज घेतली होती आणि तहकूब महासभेत कोणतीही लक्षवेधी घेता येत नाही. विरोधकांनी ती दाखल केली असली तरी सभा तहकूब असल्यानेच मी ती स्वीकारली नव्हती. सभागृहात विरोधकांनी प्रश्न विचारल्यानंतर मी हेच त्यांना सांगितले, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पीठासनासमोर गोंधळ घातला आणि पीठासनावर चढूनदेखील राजदंडाला हात लावला. हे बरोबर नाही. त्यामुळेच कामकाज तहकूब करावे लागले. - रंजना भानसी, महापौर