पदवीधरला झाली, मिनी मंत्रालयाला होईल का आघाडी?
By admin | Published: January 18, 2017 12:53 AM2017-01-18T00:53:58+5:302017-01-18T00:54:15+5:30
पदवीधरला झाली, मिनी मंत्रालयाला होईल का आघाडी?
नाशिक : नुकत्याच घोषित झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांपासून प्रदेश नेत्यांपर्यंत सर्वच पातळीवरून अनुकूलता असतानाही प्रत्यक्षात ही आघाडी काही तालुक्यांपुरता किंवा गट-गणांपुरतीच मर्यादित राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांपूर्वी होऊ घातलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आघाडीबाबत तालुका पातळीवरील नेत्यांची व इच्छुकांची मनोगते जाणून घेतली. मात्र आघाडी करण्याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी होऊ शकते, असे सुतोवाच केले आहे. तसाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केला आहे. संपूर्ण जिल्ह्णासाठी कॉँग्रेससोबत आघाडी शक्य नसली तरी काही तालुक्यांपुरता निश्चितपणे राष्ट्रवादीचा ‘सन्मान’ जपून आघाडी करण्यात येईल. तशी अनुकूलता सुरगाणा, नांदगाव, देवळा, सिन्नरसह काही तालुकाध्यक्षांनी दाखविल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. याचाच अर्थ दोन्ही कॉँग्रेसला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आघाडी हवी आहे. मात्र ती सोयीच्या तालुक्यात व सोेयीच्या गटात हवी आहे. जिथे इच्छुकांची संख्या भरमसाठ आणि जिथे मित्रपक्षाला जागा सोडणे शक्य होणार नाही. त्याठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता धूसर आहे. नाही म्हणायला प्रदेश पातळीवरूनच जर आघाडीचा निर्णय झालाच, तर मात्र दोन्ही कॉँग्रेसच्या इच्छुकांना आवर घालण्याचे काम जिल्हा स्तरावरील नेत्यांना करावे लागणार आहे. तूर्तास तरी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी दोन्ही कॉँग्रेसची आघाडी झाल्याचे दिसत असले तरी ही आघाडी कायम राहील काय? हे पाहणे महत्त्वाचे आहे.