बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वाटप
By admin | Published: July 1, 2017 12:35 AM2017-07-01T00:35:00+5:302017-07-01T00:35:13+5:30
येवला : राज्य शासनातर्फे स्वस्त धान्य (रेशनिंग) दुकानधारकांना धान्य वितरित करण्यासाठी पीओएस मशीन दिल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : राज्य शासनातर्फे स्वस्त धान्य (रेशनिंग) दुकानधारकांना धान्य वितरित करण्यासाठी पीओएस मशीन दिल्या जात आहेत. त्यानुसार येवला तालुक्यातील रेशन दुकानदारांना या मशीनचे वाटप व मशीन वापराबाबतचे प्रशिक्षण जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले. या प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार नरेशकुमार बहिरम, पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे, पुरवठा अव्वल कारकून योगेश पाटील, पुरवठा उपलेखापाल पुष्कराज केवारे, लिपिक सरोदे आदींसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी उपस्थित होते. रेशन धान्य दुकानांमध्ये होणारा गैरकारभार रोखण्यासाठी राज्य शासनाने पीओएस मशीनच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत असलेल्या रेशन दुकानधारकांना पीओएस मशीन दिल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सदर पीओएस मशीन वापरण्याचे प्रशिक्षण संबंधित रेशन दुकानदारांना आज तहसील कार्यालयात देण्यात आले. यात पीओएस मशीनचा वापर कसा करावा, कार्डधारकांचे थंब कसे घ्यावे यासह इतर आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व रेशन दुकानदारांना प्रस्तुतीकरणाद्वारे पीओएस मशीनची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली, तसेच प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सर्व दुकानदारांकडून किमान दोन रेशनकार्डावरील व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण करून घेण्यात आले. दुकानदारांनी स्वत: ई-पॉज मशीन हाताळून पाहिले व मशीन वापरणे सोपे आहे, अशी प्रतिक्रि या व यापुढील सर्व व्यवहार यामार्फतच होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी कंपनीचे तांत्रिक विभागाचे अधिकारी जयेश सुदन यांनी दुकानदारांना मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. या मशीन थेट दिल्लीला जोडण्यात आलेल्या आहेत. पात्र लाभार्थी रास्त भाव दुकानात आला की त्याचा अंगठा मशीनवर उमटवेल आणि त्वरित लाभार्थीचा संपूर्ण डाटा पाहावयास मिळून त्याला किती धान्य द्यायचे, त्याचे किती पैसे घ्यायचे याबाबतच्या संपूर्ण तपशिलाची पावती मशीनमध्ये तयार होऊन ती लाभार्थीला मिळणार आहे. या उपकरणाद्वारे शिधापत्रिका धारकांना धान्य खरेदी करणे सोयीचे व पारदर्शकतेचे होणार आहे.
रेशनकार्डचा डेटा आधार क्र मांकाशी संलग्न करण्यात आला आहे. त्यामुळे पीओएस मशीनवर ग्राहकांच्या बोटांच्या ठशावरून धान्य विक्र ी करता येणार आहे. पीओएस मशीनचा वापर केल्यानंतर मशीनच्या संगणकीकृत डेटामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांनी पीओएस मशीनद्वारेच धान्य वाटप करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी केले आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण
पेठ : राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकान वाटप प्रणालीत दिनांक १ जुलैपासून बदल करण्यात आले असून, आता लाभार्थींना ई-पॉझ मशीनच्या साहाय्याने बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करण्यात येणार असून, तालुका पुरवठा विभागाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदारांना नव्या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांच्या उपस्थितीत पेठ तालुक्यातील १२९ स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देऊन ई- पॉझ मशीनचे वाटप करण्यात आले. तहसीलदार हरीश भामरे यांनी नव्या प्रणालीच्या वापराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची व कार्यवाहीबाबतची माहिती दिली. स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी शासनाने डिजिटल पाऊल उचलले असून, स्वस्त धान्य दुकानदारांनी या योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी केले.