...अखेर धान्य किराणा व्यापाऱ्यांचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:44+5:302020-12-14T04:30:44+5:30
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एक टक्का सेवा शुल्काविरोधात नाशिकमधील घाऊक धान्य ...
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एक टक्का सेवा शुल्काविरोधात नाशिकमधील घाऊक धान्य किराणा व्यापारी व किरकोळ किराणा व्यापारी संघटनांनी पुकारलेला बंद अखेर रविवारी (दि.१३) सायंकाळी सेवा शुल्काबाबात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सेवा शुल्क देण्यास केलेला विरोध व बाजार समिती संचालक मंडळाने शुल्क वसुलीसंदर्भात घेतलेली भूमिका यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे.
घाऊक धान्य किराणा व्यापारी संघटनेने गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजार समितीत व्यवहार बंद ठेवून आक्रमक भूमिका घेत सेवा शुल्क वसुलीला विरोध केला होता. व्यापारी संघटनांनी बाजार समिती आवारात सर्व व्यवहार बंद ठेवून शुल्क वसुलीविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या मुद्द्यावर शुक्रवारी झालेली बैठक फिस्कटल्यानंतर शनिवारी संपूर्ण शहरातील किराणा व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून शुल्क वसुलीला विरोध दर्शविला; मात्र त्यानंतरही बाजार समितीतील पदाधिकारी सेवा शुल्क वसुलीच्या निर्णयावर ठाम राहिल्याने व्यापारी आणि बाजार समिती पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळामार्फत बाजार समिती पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यात रविवारी दिवसभर बाजार समितीतील पदाधिकारी आणि व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळात विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर हा तिढा सुटला आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बाजार समिती पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर सेवा शुल्काच्या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर व्यापारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नाशिक घाऊक धान्य किराणा व्यापारी संघटनेेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली.