ग्रामपंचायत लिलाव प्रकरणाचा अहवाल प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:16+5:302021-01-08T04:44:16+5:30
नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची बोली लावण्यात आल्या प्रकरणाचा ...
नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची बोली लावण्यात आल्या प्रकरणाचा अहवाल देवळा तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून थंड पडलेल्या या प्रकरणाला आता आयोगाच्या आदेशामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बोलीप्रकरणी अगोदर नमरमाईची भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या आदेशानंतर कारवाईची तयारी चालविली असल्याचे समजते.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी लिलाव करण्यात आल्याच्या घटना घडल्या असताना नाशिकमध्येदेखील देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी दोन कोटी पाच लाखांची बेाली लावण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार चर्चेत आला असताना जिल्हा प्रशासनाकडून फारशी गंभीर दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर देवळा तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
सरपंचपदासाठी सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी बोली लावली जात असल्याची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील उमराणे लिलावप्रकरणी कारवाई अटळ मानली जात आहे.
--इन्फो--
आयोगाच्या आदेशाप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमराणे ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. उमराणे ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १५ जागादेखील बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. यापूर्वी आठ जागांसाठी एकमेव अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध झालेल्या आहेत, माघारीच्या दिवशी पुन्हा सात जागा बिनविरोध झाल्याने आता केवळ दोन जागांसाठी औपचारिकता उरली आहे. त्यामुळे लिलावप्रकरणी सोशल मीडियावर आलेल्या व्हिडीओच्या आधारावर कितपत कारवाई करणे ग्राह्य ठरू शकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.