ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळावा विमाकवचाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:14 AM2021-05-26T04:14:08+5:302021-05-26T04:14:08+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी देविदास केशव साळवे व पाडळी देशमुखचे कर्मचारी सुनील तुकाराम धांडे ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी देविदास केशव साळवे व पाडळी देशमुखचे कर्मचारी सुनील तुकाराम धांडे यांचा कोरोनाकाळात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला असून त्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार ५० लाखांच्या विमाकवचाचा लाभ मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे तसेच इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कातोरे यांच्यासह तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जीवाची पर्वा न करता जनजागृतीसह रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. इगतपुरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रस्थानी राहून ग्रामस्तरीय कोरोना समिती, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोनाकाळात कोरोना योद्धा म्हणून मोलाची भूमिका बजावत आहेत. अशी भूमिका बजावत असतानाच इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील ग्रामपंचायतीचे आरोग्य कर्मचारी देविदास केशव साळवे व पाडळी देशमुख येथील कर्मचारी सुनील तुकाराम धांडे यांचा कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून याकडे संबंधित शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने मुदतवाढ दिलेल्या ३०/६/२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये सानुग्रह लाभ मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे, इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कातोरे, सरचिटणीस उज्ज्वल गांगुर्डे, उपाध्यक्ष नामदेव गायकर, गणेश भगत, सचिव संपत जगताप आदींनी केली आहे.