ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चानेच काढल्या पानवेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:11+5:302021-03-16T04:15:11+5:30
एकलहरेः तालुक्याच्या पूर्व भागात गोदावरी नदीत साचलेल्या पानवेलींमुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाल्याने नागरिकांसह मुकी जनावरेही त्रस्त झाली होती. ...
एकलहरेः तालुक्याच्या पूर्व भागात गोदावरी नदीत साचलेल्या पानवेलींमुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाल्याने नागरिकांसह मुकी जनावरेही त्रस्त झाली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणेची वाट न पाहता लाखलगावच्या सरपंचांनी स्वखर्चाने लाखलगाव व गंगापाडळी परिसरातील नदीपात्रात साचलेली पानवेली काढण्यास पुढाकार घेतला.
गोदावरीच्या दोन्ही तिरावरील माडसांगवी, गंगावाडी, शिलापूर, एकलहरे, ओढा, लाखलगाव गंगापाडळी या गावातील नागरिक गोदावरी नदीतील पाणवेलींमुळे निर्माण झालेल्या डासांनी त्रस्त झाले होते. या डासांमुळे सायंकाळी नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले, तर दुभती जनावरे डासांच्या उपद्रवाने त्रस्त झाली होती. नदीतील पानवेली पाटबंधारे विभागाने अथवा महापालिकेने काढून नागरिकांंना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून कोणत्याही शासकीय यंत्रणेची वाट न पाहता लाखलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी स्वखर्चाने पानवेली काढण्यास सुरुवात केली. लाखलगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विकास जाधव, प्रदीप कांडेकर, स्नेहल मेहेंदळे व इतर सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेत गोदावरी घाट व परिसरातील पानवेली जेसीबीच्या सहाय्याने काढून परिसर स्वच्छ केला. यावेळी संतोष मेहेंदळे, कैलास वलवे, धोंडीराम कानडे, कैलास चव्हाण उपस्थित होते.
कोट===
लाखलगाव गंगापाडळी परिसरात गोदावरीचे पात्र विस्तीर्ण आहे. दसक, पंचक, एकलहरे, शिलापूर येथे साचलेल्या पानवेली वाहून आल्यावर लाखलगाव येथे साचतात. त्यामुळे नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्वखर्चाने पानवेली काढल्या.
-आत्माराम दाते, उपसरपंच लाखलगाव.
(फोटो १५ पानवेली)