ग्रामपंचायतीच्या जागा ४९५, अर्ज फक्त ३४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:01 AM2018-02-13T01:01:53+5:302018-02-13T01:04:24+5:30
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देऊनही एकूण रिक्त असलेल्या ४९५ जागांसाठी फक्त ३४० अर्ज प्राप्त झाले असून, त्यातही एकेका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने नामांकनाअभावी रिक्त राहणाºया पदांसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून त्यासाठी दि. ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान नामांकन दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती; परंतु या मुदतीत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारच पुढे न आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता यावे म्हणून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु या मुदतीतही पाहिजे त्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकांचा उत्साह दिसून आला नाही.
जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींतील ४९५ पदे रिक्त असून, त्यासाठी सोमवार अखेर फक्त ३४० अर्ज आले आहेत. त्यातही काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले असल्यामुळे रिक्त पदांपेक्षाही कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी या अर्जांची छाननी केली जाणार असून, माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची रिक्त पदांची संख्या पाहता नजीकच्या काळात पुन्हा फेरनिवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. मतदार व उमेदवारांची उदासिनता व राखीव जागांवर निवडणूक लढविणाºयांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन याच कारणामुळे वर्षानुवर्षे काही ग्रामपंचायतींची पदे रिक्त आहेत.