ग्रामपंचायतीकडून गावात कीटकनाशक औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:10 PM2020-03-19T22:10:36+5:302020-03-20T00:09:41+5:30
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची ग्रामपंचायतीने दखल घेत गावातून स्वच्छता व कीटकनाशक औषधे फवारणी मोहीम हाती घेतली आहे.
ब्राह्मणगाव : देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची ग्रामपंचायतीने दखल घेत गावातून स्वच्छता व कीटकनाशक औषधे फवारणी मोहीम हाती घेतली आहे.
याआधीच प्राथमिक आरोग्य केंद्रातही आरोग्य कल्याण समितीची तातडीची बैठक होऊन त्यात या कोरोना व्हायरसविषयी काळजी व उपाययोजना यावर जि. प. सदस्य लता विलास बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात येऊन आवश्यक ती उपाययोजना, ग्रामपंचायतीने करावयाची कामे यावर चर्चा करण्यात आली. त्यात आठवडे बाजारही बंद, ग्रामस्थांना मार्गदर्शन म्हणून सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्याचे ठरविण्यात आले.
गावातून घराघरांतून कोरोना व्हायरसबाबत आवश्यक काळजी व उपाययोजना याच्या माहितीपत्रक वाटपाचे काम आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत करण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कांबळे यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. आवारे, सरपंच सरला अहिरे यांनी उपाययोजना बैठकीत चर्चेत सहभाग घेतला. गावातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्याने सर्वत्र शांतता पसरली आहे. सोशल मीडिया व टीव्हीच्या माध्यमातून जनतेला आवश्यक ती माहिती उपलब्ध झाल्याने जनतेनेही अनावश्यक प्रवास, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, वेळोवेळी हात धुणे, तोंडाला रुमाल किंवा मास्क लावणे चालू केले आहे.