ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प
By admin | Published: May 27, 2017 11:53 PM2017-05-27T23:53:40+5:302017-05-27T23:54:15+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली अद्याप न झाल्याने बँक डबघाईस आली आहे. बँकेत पैसेच नसल्याने उलाढाल थांबली आहे. ग्रामसेवक शिक्षक आदींसह अनेकांचे पेमेंट मिळत नाही. ग्रामपंचायतीसंबंधी पेमेंट थांबल्याने कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी अनेक जीवनावश्यक व आरोग्याशी निगडित कामांवर परिणाम झाला आहे.
या संबंधात त्र्यंबकेश्वर तालुका बँकेच्या विभागीय कार्यालयास भेट दिली व बँकेची आर्थिक स्थिती खालावण्याचे कारण काय? असे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वारे वाहत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांनी घेतलेले पैसे कर्जमाफी मिळेल या आशेवर कर्ज कोणी भरण्यासाठी तयार नाही. आज त्र्यंबक तालुक्यात बँकेची सभासद संख्या ६५०० आहे. आणि या सर्वांनी कर्ज उचललेले आहे. यात ४५०० सभासद थकबाकीत गेले आहेत. बँकेची थकबाकी ६४ कोटी असून, वसुली फक्त ४ टक्के म्हणजे ४ कोटी तर व्याज ३ कोटी असे ७ कोटीच फक्त वसूल आहेत. आज ५० कोटी थकीत रक्कम असल्याने बँकेच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. बँकेत कोणताच भरणा होत नाही. वीजबिले बंद झाली आहेत. थकबाकीदारांची संख्या अजून वाढणार असून मध्यम कर्ज व अल्प मुदतीची वसुली आता सुरू होणार आहे. ७५ टक्के कर्जामध्ये द्राक्ष, ऊस आदी बागायती शेतीसाठी कर्ज दिलेले आहे. त्यामुळे या कर्जाचीदेखील थकबाकी वाढणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल असल्याने ग्रामीण भागात विखुरला आहे. आता खरिपाचा हंगाम सुरू होणार आहे. ग्रामीण आदिवासी शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्यांशिवाय आधार नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे कर्जमाफीची आशा तर दुसरीकडे या आशेमुळे घेतलेले कर्ज भरले गेले नाही, वसुली होत नाही. त्यातल्या त्यात बँकेच्या जुन्या नोटा सुमारे ३५० कोटी, ज्या बदलून मिळाल्या नसल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली. आज त्र्यंबकेश्वर बँकेत कोणी कर्मचारी जागेवर दिसला नाही. एखादा दिसला असेल तर तो म्हणाला व्यवहाराच नाही तर बसून काय करणार ? सध्या बँकेने महसूल विभागामार्फत तलाठ्यांकडून थकबाकीदारांच्या सात बारा उताऱ्यावर बँकेचे नाव मोबदला करण्यास सुरु वात झाली आहे.