ग्रामपंचायतींना आरोग्यावर खर्चासाठी बंधने नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:38+5:302021-05-08T04:15:38+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.७) घेण्यात आली. यावेळी भाजप गटनेते डॉ. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाइन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.७) घेण्यात आली. यावेळी भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींकडून साथरोगावर निधी खर्च केले जात नाहीत, काही ग्रामसेवकांना विचारणा केली असता, त्यांनी जिल्हा परिषदेचे आदेश नसल्याची कारणे सांगितली. त्यामुळे जिल्हा परिषदेने तशा त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. त्यावर बनसोड यांनी पंधराव्या वित्त आयोगातून साथरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास शासनानेच परवानगी दिली असून, त्यासाठी स्वतंत्र आदेशाची गरज नाही. गेल्यावर्षी चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी मास्क, सॅनिटायझर आदी कामांसाठी खर्च केला आहे. तसाच खर्च पंधराव्या वित्त आयोगातून करता येतो. त्यासाठी ग्रामपंचायतींनी निधी खर्च करण्यासाठी वेगळे पत्र देण्याची गरज नाही. काही ठिकाणी हा मुद्दा असेल, तर तेथील ग्रामसेवकांना मी सूचना देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट ==
रुग्णसंख्या कमी करण्यावर भर
आरोग्यविषयक चर्चेत भाग घेताना बनसोड यांनी, गेल्या काही दिवसांपासून आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचे काम केले जात असून, अनेक खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे तसेच जवळपास एक हजाराहून अधिक अतिरिक्त बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सोयी, सुविधा निर्माण केल्या जात आहेत. रुग्णसंख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्नांवर भर दिला जात असल्याचे सांगितले.