कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच नव्याने कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:38 AM2020-02-16T01:38:42+5:302020-02-16T01:40:00+5:30
नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे ...
नाशिक : ग्रामपंचायतींची क्षमता नसतानाही अनेक कामे मंजूर केली जातात, परिणामी अनेक कामे वर्षांनुवर्षे रखडत असल्यामुळे यापुढे जुनी कामे पूर्ण केल्याशिवाय ग्रामपंचायतींना नवीन कामे मंजूर न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यापूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी तशी खात्री केल्याशिवाय सक्षमता प्रमाणपत्र देऊ नये, असा ठरावही करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आत्माराम कुंभार्डे यांनी सदरचा प्रश्न उपस्थित केला. ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येणारी जनसुविधेची कामे जिल्हा नियोजन विकास समिती मंजूर करते व ग्रामपंचायत कामे करते. यात जिल्हा परिषदेचा काही संबंध नसला तरी, फक्त निधी वितरित जिल्हा परिषद करीत असल्याने सदरचा निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेच्या माथी खापर फुटते. सन २०१७-१८ मध्ये ग्रामपंचायतीने कामे न केल्यामुळे दहा कोटींचा निधी परत गेल्याने जिल्हा परिषदेची नाचक्की झाली असल्याचे कुंभार्डे यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायतींनी दोन कामे मंजूर असताना पुन्हा तिसरे कामही मंजूर झाले आहे. अशा ग्रामपंचायतींची आर्थिक सक्षमता नसतानाही निव्वळ कामे घेऊन रखडवली आहेत. अशा ग्रामपंचायतींना संबंधित गटविकास अधिकाºयांकडून सक्षमता प्रमाणपत्र दिले जाते, परंतु मागची कामे तपासली जात नसल्याचेही सभेत सांगितले. त्यामुळे यापुढे ज्या ग्रामपंचायतींनी पहिली दोन कामे पूर्ण केली नसतील तर त्यांना नवीन कामे दिली जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला व त्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर निश्चित करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.
शिक्षकांची रिक्त पदे भरणार
या सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी दोन दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील पांझण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे का भरण्यात येत नाही, असा सवाल केला. यावर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी प्राथमिक शिक्षकांची ४४० पदे रिक्त असून, १४० मुख्याध्यापक व १९० पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय येत्या आठवड्यात निकाली काढण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर शिक्षकांच्या पदांबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.