ग्रामीणची शहर पोलिसांवर ६९ धावांनी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:34 AM2021-01-09T01:34:43+5:302021-01-09T01:35:42+5:30
पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला.
नाशिक : पोलीस सप्ताहानिमित्त नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये रंगलेल्या क्रिकेट सामन्यात ग्रामीण पोलिसांनी वरचष्मा गाजवत शहर आयुक्तालयाविरुद्ध ६९ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही या प्रेक्षणीय सामन्याचा मनसोक्त आनंद लुटला.
पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. ८) शहरातील पोलीस कवायत मैदानावर ग्रामीण पोलीस विरुद्ध शहर पोलीस दलाच्या प्रेक्षणीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता पोलीस आयुक्त दीपक पांडे व पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला प्रारंभ झाला.
ग्रामीण पोलीस दलाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने नियोजित १२ षटकांत विक्रमी १६१ धावांचा डोंगर उभा करून शहर पोलिसांसमोर विजयासाठी १६२ धावांचे आव्हान ठेवले. यात ग्रामीण पोलीस दलाचे उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी तडाखेबंद १०९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरारादाखल विजयासाठी १६२ धावांचे आव्हान समोर घेऊन मैदानात उतरलेल्या शहर पोलीस दलाचा संघ १२ षटकात अवघ्या ९२ धावाच करू शकला.
यामुळे ग्रामीण दलाचा ६९ धावांनी विजय झाला. या सामन्यात शतक ठोकणाऱ्या स्वप्निल राजपूत यांना सामनावीर पुरस्काराने तर सहायक पोलीस निरीक्षक रोकडे यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौघुले - श्रींगी, अतिरिक्त अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
सांघिक भावनेसाठी खेळ महत्त्वाचा
क्रिकेटसह कोणताही मैदानी खेळ हा शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. खेळातून मानसिक आरोग्य सुधारण्यासाह सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होते. ज्याचा उपयोग प्रत्यक्ष कामगिरीत होतो. त्यामुळे प्रत्येकाने खेळले पाहिजे, शारीरिक तंदुरुस्ती जपली पाहिजे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी केले.