ग्रामसेवक, आरोग्यसेवकांसह पाच संवर्गातील बदल्या रद्द
By admin | Published: May 31, 2015 12:45 AM2015-05-31T00:45:52+5:302015-05-31T00:46:18+5:30
ग्रामसेवक, आरोग्यसेवकांसह पाच संवर्गातील बदल्या रद्द
नाशिक : शिक्षक बदल्यांपाठोपाठ आता ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यिका, अंगणवाडी पर्यवेक्षक व पशुधन पर्यवेक्षक या पाच संवर्गातील कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. या पाचही संवर्गातील केलेल्या बदल्या स्थगित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी या विभागप्रमुखांना दिले आहेत.शिक्षक बदल्या करू नयेत, असे शासन स्तरावरून स्पष्ट करण्यात आले होते. मागील आठवड्यातच शिक्षकांच्या आपसी (वर्गवारी) बदल्या करण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दिला होता. दरम्यानच्या काळात शिक्षकांच्या आपसी बदल्या करण्यावरून मतभेद असल्याने आणि शिक्षण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बदल्या न करण्याचा ठराव संमत करण्यात आल्याने प्रशासनाने या बदल्यांची कारवाई बासनात बांधली होती. आता आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण तसेच ग्रामपंचायत विभागातील काही कर्मचाऱ्यांनी ५ मार्चच्या शासन निर्णयाचा आधार घेत पेसा कायद्यांतर्गत पेसा कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील कर्मचाऱ्यांना जेथे राहतात, तेथे नियुक्ती देण्याचा व प्राधान्यक्रम निवडण्याचा अधिकार आहे. मात्र तत्पूर्वीच बदल्यांची कार्यवाही झाल्याने बिगर आदिवासी भागातील अनुसूचित जमाती संवर्गातील कर्मचारी ज्यांना त्यांच्या मूळ पेसा कार्यक्षेत्रात बदली हवी आहे, ती प्रशासनाला देणे भाग आहे. त्यामुळेच मागील आठवड्यात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या कार्यवाहीतील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यिका, ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक व अंगणवाडी पर्यवेक्षक या पाच संवर्गातील बदल्यांची करण्यात आलेली कार्यवाही स्थगित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी संबंधित खातेप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे या पाच संवर्गाबरोबरच अन्य संवर्गातील बदल्याही रद्द होण्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.(प्रतिनिधी)