रासेगाव येथील ग्रामसेवक अखेर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:30 AM2019-03-17T01:30:26+5:302019-03-17T01:31:43+5:30
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे.
नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून अखेर निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवह्णा व संचिका अद्ययावत न ठेवणे, ग्रामनिधी, १४वा वित्त आयोगाचे दप्तर अपूर्ण ठेवणे, इतर योजनांचे कॅशबुके व ग्रामनिधी, मासिक सभा रजिष्टर तपासणीसाठी उपलब्ध करून न देणे तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आदी कारणांमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कामकाजात अनेक त्रुटी आणि तक्रारी समोर आल्यानंतर त्यांना वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. कामकाज सुुधारण्याची संधी देऊनही सुधारणा होत नसल्याचे अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन याप्रकरणी तपासणी केली असता ग्रामसेवकाविरु द्धच्या तक्र ारीत तथ्य आढळून आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिंडोरीचे गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे यांनी ग्रामसेवकास तत्काळ निलंबित केले आहे.