शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:32 AM2018-06-23T00:32:35+5:302018-06-23T00:32:49+5:30
पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.
नाशिक : पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची आढावा बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. गिते म्हणाले की, जिल्ह्णात पहिल्यांदाच सर्व गावांतील, अंगणवाडी व शाळांमधील जलकुंभ व हातपंप यांची स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहिमेत गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तसेच टाक्यांची स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बालविकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहारसंहिता याबाबत आढावा घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सिंचनविहीर, विहीर पुनर्भरण, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतींमधील जनसुविधेची कामे, घरकुल इ. योजनांची अपूर्ण बांधकामे याबाबत आढावा घेऊन सर्व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.