विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा २९ ला नाशकात महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 06:18 PM2018-04-19T18:18:01+5:302018-04-19T18:18:01+5:30
इतर समाजाच्या तुलनेत मागे पडलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल.
नाशिक : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, लिंगायत धर्मातील जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी रविवार, दि. २९ रोजी सकाळी १० वाजता नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लिंगायत संघर्ष समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
उर्वरित १४ पोटजातींना इतर मागासवर्गीय दर्जा मिळावा, जंगम समाजातील माला, बेडा, बुडगा या जातींना मागासवर्गीय दाखले मिळावेत आदी विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत. लिंगायत धर्माला मान्यता मिळाल्यास या वर्गातील समाजबांधवांना स्वतंत्र धर्मपीठाची मान्यता, लिंगायत अल्पसंख्याक शाळा, धार्मिक स्थळांचा विकास असे अनेक लाभ मिळवता येतील व इतर समाजाच्या तुलनेत मागे पडलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात येता येईल, असे समितीतर्फे सांगण्यात आले. या मोर्चात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी विभागातील हजारो लिंगायत समाजबांधव सहभागी होणार आहेत. नाशिकरोडच्या पासपोर्ट कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चाची समाप्ती होणार आहे. लिंगायत संघर्ष समितीने २०१४ पासून या मागण्यांसाठी ठिकठिकाणी मोर्चे, उपोषण आदी केले होते. तत्कालीन सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र अद्याप त्याची पूर्तता न झाल्याने समितीकडून तीव्र संघर्ष करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी काका कोयटे, अनिल चौघुले, चंदशेखर दंदणे, दुर्गेश भुसारे, अॅड. अरुण अवटे आदी उपस्थित होते.