नाशिकचे आजोबा लय भारी; पंचाहत्तरीतही प्रवासाची हौस न्यारी,अर्ध्या तिकिटापेक्षा मोफत प्रवास करणारे ज्येष्ठ अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:52 AM2022-09-02T07:52:50+5:302022-09-02T07:53:03+5:30
ST News: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एस.टी. बसमधून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आणि राज्यभरातून या योजनेला ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद लाभला.
नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एस.टी. बसमधून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आणि राज्यभरातून या योजनेला ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यात नाशिक जिल्हादेखील मागे नाही. नाशिकमध्ये अवघ्या पाचच दिवसांत दहा हजार ज्येष्ठ नागरिकांनी बसमधून मोफत प्रवासाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे प्रवास करणाऱ्यांमध्ये अर्धे तिकिटाची योजना असलेल्या ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठांपेक्षा ७५ वयावरील ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्ताने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी राज्य शासनाने योजनेची घोषणा केली होती. दि. २६ ऑगस्टपासून प्रत्यक्ष योजनेला सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच नाशिकमधील ज्येष्ठांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील १३ डेपोंमध्ये योजनेचे लाभार्थी दिसून आले. त्यामध्ये नाशिकमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल १० हजार ७१७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, तर अर्धेे तिकिटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या ८००७३ इतकी आहे.
राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.च्या सर्व सेवांमधून मोफत, तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. दि. २६ ऑगस्टपासून या योजनेचा प्रारंभ झाला. नाशिक जिल्ह्यातील नाशिक-१ आगारातून मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. अनेकांनी पुणे, त्र्यंबकेश्वर, वणी असा प्रवास केल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांनी दिली. मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचेदेखील महामंडळाकडून सांगण्यात आले.
वयाचा पुरावा हेच तिकीट
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना वयाचा पुरावा म्हणून छायाचित्र असलेले कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाते. ज्या ओळखपत्रावर जन्मतारीख आणि छायाचित्र असेल असा पुरावा महत्त्वाचा मानला जातो. तसेच काही ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्ट कार्डदेखील असल्याने त्यांना या कार्डच्या माध्यमातूनही प्रवास करता येत आहे.