आजी-माजी अध्यक्ष तयारीत; पदाधिकाऱ्यांचा सावध पवित्रा
By admin | Published: May 16, 2016 11:37 PM2016-05-16T23:37:27+5:302016-05-17T00:10:55+5:30
आयमा निवडणूक : उमेदवारी अर्ज विक्रीचा पहिला दिवस निरंकं
सिडको : अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा (आयमा) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, आज अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज घेतला नसल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आजी-माजी अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
एकीकडे मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाचा दिलेला शब्द पाळावा अन्यथा निवडणूक लढविणारच, असा पवित्रा तुषार चव्हाण गटाने घेतला आहे. तर सत्ताधारी मात्र असा शब्द दिला नसल्याचे सांगत आहे. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाकडून विद्यमान सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष वरुण तलवार, नीलिमा पाटील व पंडित ब्राह्मणकर यांची नावे पुढे आली आहेत. सत्ताधारी गटाकडील चार उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली असतानाच सत्ताधारी गटाकडून माजी अध्यक्ष सुरेश माळी व विद्यमान अध्यक्ष विवेक पाटील यांच्याही नावाची चर्चा होत असताना या निवडणुकीत माजी अध्यक्षांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विरोधी गटाकडून तुषार चव्हाण हेच एकमेव उमेदवार आहेत. आज अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी एकही अर्जाची विक्री झाली नसल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले. मागील निवडणुकीत अध्यक्षपदासाठीचे उमेदवार विवेक पाटील यांचे नाव दहा दिवस आधीच जाहीर करण्यात आले होते. यंदा मात्र सत्ताधारी गटाकडून सहा उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यानंतरही अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करण्यात येत नसल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अध्यक्षपदासाठी विरोधी गटाकडून आयमाचे माजी उपाध्यक्ष तुषार चव्हाण हे एकमेव उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या सर्व घडमोडींमुळे आयमा निवडणुकीकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)