आजी विरुद्ध नात

By Admin | Published: February 12, 2017 12:05 AM2017-02-12T00:05:18+5:302017-02-12T00:05:29+5:30

न्यायडोंगरी गट : लक्षवेधी लढतीकडे तालुक्याच्या नजरा

Grandson against grandmother | आजी विरुद्ध नात

आजी विरुद्ध नात

googlenewsNext

 संजीव धामणे नांदगाव
सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक न्यायडोंगरी गटात रंगली आहे. एकीकडे आजी विरुद्ध नातीच्या अटी-तटीच्या होणाऱ्या लढतीत, अहेरांच्या बालेकिल्ल्यात दोघात तिसरा या न्यायाने गावच्या महिला सरपंचने आपली उमेदवारी कायम ठेवून रंग भरण्यास सुरुवात केली आहे. काय घडेल न्यायडोंगरीत हे बघणे त्यामुळे मनोरंजक ठरणारे आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
न्यायडोंगरी अन् अहेरांच्या नातेसंबंधांची वीण तशी कायम घट्ट राहिली असताना पहिल्यांदाच भाऊबंदकी उभी राहिली आहे. त्यामुळे गेलेला तडा साधणार कसा हा प्रश्न उभा राहतो, मग निकाल कोणताही लागो. गेल्या निवडणुकीत बापूसाहेब कवडे यांच्या मुलाचा तेजचा निसटत्या मतांनी पराभव करून शशिकांत मोरे या शिवसैनिकाने गणात विजय मिळविला होता. अहेरांमुळे आपला पराभव झाला ही भावना आज ही बापूसाहेबांच्या मनात घर करून आहे. मोरे यांच्या अगोदर राजाभाऊ अहेर यांनी २००२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळविला होता. त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली होती. न्यायडोंगरीत शिवसेनेच्या प्रभावाला पुढे नेण्याचे काम त्यावेळी बापूसाहेब कवडे यांनीच केले होते.
न्यायडोंगरी गणात शिवसेनेच्या विद्या पाटील उमेदवारीसाठी दावेदार असताना त्यांच्याऐवजी बिरोळ्याच्या सुरेखा शेलार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात अस्वस्थता आहे. अगोदर मोरे यांना डावलले, आता सावरगावची उमेदवारी कापली. त्यामुळे या राजकीय विरोधाभासांची परिणामकारकता कशी असेल? एकूणच न्यायडोंगरीतील लढतीला वेगळे वेगळे चढ-उतार आहेत. त्यात सर्वांच्या डोक्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे. या सर्व रणधुमाळीत गट-गणांच्या पुनर्रचनेत बापूसाहेबांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण त्यांच्या कुटुंबीयातून कोणीही रिंगणात नाही.
शिवसेनेचे नेतृत्व सुहास कांदे करत असले तरी पडद्याआडचे सूत्रधार आहेत ते बापूसाहेब कवडेच. त्यांनी न्यायडोंगरीत विलास अहेर यांना देऊ केलेले समर्थन त्यामुळे महत्त्वाचे ठरते. सध्या तालुक्याच्या पातळीवर सर्वच गटांच्या पुढाऱ्यांच्या भूमिकेत सोयीस्कररीत्या होत असलेले बदल बघता एकूणच तालुकाभरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संमिश्र मानसिकतेचे वारे आहे.
अनिल अहेरांनी व संजय पवारांनी स्वत:ला अनुक्रमे न्यायडोंगरी व भालूर गटापुरते मर्यादित करून घेतले आहे. राष्ट्रवादीचे मिशन पंचायत समितीपुरते आहे. जिल्ह्यातील लक्षवेधी लढत न्यायडोंगरीत होतेय हे त्यातले वैशिष्ट्य म्हणावे. ग्रामपंचायत जिंकणाऱ्या शशिकांत मोरे यांनी आपल्या पत्नी गायत्री यांना अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरवून रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे आजी नातीत कोण कुणावर मात करते हे बघावे लागणार आहे. नात्या-गोत्यांच्या पारंपरिकतेला साद घालीत आजी विजयाताई यांनी भावनेला हात घातलाय. आजी-नातीच्या या संघर्षाला एक किनार आहे. ती शशिकांत मोरे नावाच्या निष्ठावान शिवसैनिकाची. उणीपुरी सहा सात दशके एकहाती वर्चस्व राखणाऱ्या
अहेरांच्या न्यायडोंगरीत मोरेंनी आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली ती पहिल्यांदा पाच वर्षांपूर्वी. पंचायत समितीच्या निवडणुकीत गेल्या दीड वर्षापूर्वी सरपंचपद मिळवत मोरे यांनी अहेरांना रोखले. आजी- नातीच्या सत्तासंघर्षात मोरे यांनी सहानुभूतीची किनार उभी करण्यात यश मिळवेल की नाही, या प्रश्नाने दोघा अहेरांना सतावले आहे.

Web Title: Grandson against grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.