नातूच निघाला आजोबाचा मारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:52 PM2021-05-12T22:52:09+5:302021-05-13T00:39:05+5:30
देवळा : तालुक्यातील उमराणे येथील पंडीत सुकदेव देवरे यांचा खून झाल्यानंतर गुन्ह्याची उकल चोवीस तासांच्या आत करण्यात देवळा पोलिसांना यश मिळाले असून नातवानेच जमिनीच्या लालसेपायी आजोबाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ह्या प्रकरणी संशयित नातवाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली आहे.
देवळा : तालुक्यातील उमराणे येथील पंडीत सुकदेव देवरे यांचा खून झाल्यानंतर गुन्ह्याची उकल चोवीस तासांच्या आत करण्यात देवळा पोलिसांना यश मिळाले असून नातवानेच जमिनीच्या लालसेपायी आजोबाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ह्या प्रकरणी संशयित नातवाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली आहे.
उमराणे येथील जुने झाडी रस्ता शिवारात पंडित सुकदेव देवरे (६७) हे अविवाहित इसम आपल्या दोन अविवाहित बहिणींसह आपल्या शेतावर रहात होते. त्यांची एक विवाहित बहीण राजदेरवाडी येथे रहात होती. पंडित देवरे यांची आठ एकर शेती होती. शेतीच्या कामानिमित्त राजदेरवाडी येथील बहिणीचा नातू शुभम जाधव हा नेहमी पंडित देवरे यांचेकडे येत असे. रविवार दि. ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पंडित देवरे यांच्या मानेवर वार करून त्यांना ठार केले व त्यांचे मृतदेह झुडपात टाकून दिला.
सोमवारी सकाळी पंडित देवरे यांचा शोध घेतला असता ते मृतावस्थेत पडलेले आढळून आले. देवळा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी मृत पंडित देवरे यांचेकडे नेहमी येणारे जाणारे नातेवाईक, तसेच शेजारील शेतकरी यांच्याकडे चौकशी सुरू केली. सर्व घटनाक्रम, परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे तपास सुरू असतांना मयत पंडित देवरे यांचे राजदेरवाडी येथील बहिणीचा नातू शुभम लक्ष्मण जाधव (२१) याच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांना त्याचा संशय आल्यामुळे त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्यानेच जमिनीच्या मोहापायी खून केल्याचे उघडकीस आले आहे. आजोबाकडे असलेली ८ एकर शेती त्याच्या मनात भरली व ती मिळविण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हातावरील जखमांवरून बळावला संशय
पोलिस चौकशी करत असतांना शुभम हा सारखा घटनास्थळावर संशयास्पद रितीने फिरत होता. तो त्याचा डावा हात खिशात ठेवत होता व तो हात तो खिशातून बाहेत काढत नसल्याची बाब पो.कॉ. नीलेश सावकार यांच्या चौकस दृष्टीने हेरली. सावकार यांनी शुभमशी संवाद साधत त्याला विविध निमित्ताने खिशातून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु शुभम बधला नाही. यामुळे त्यांचा शुभमवरील संशय बळावला. सावकार यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुभमच्या हातावर आजोबांशी झालेल्या झटापटीत जखमा झाल्यामुळे तो खिशातून हात बाहेर काढत नसल्याचे स्पष्टीकरण नंतर शुभमने दिले.