पंचवटीतील ५४ उद्यानांच्या देखभालीचा ठेका मंजूर
By admin | Published: September 2, 2016 12:40 AM2016-09-02T00:40:24+5:302016-09-02T00:40:25+5:30
स्थायी समिती : ठेकेदारांकडून प्रतिसाद
नाशिक : शहरातील उद्यानांच्या देखभालीचा ठेका रखडला असतानाच पंचवटी विभागातील ५४ उद्यानांच्या देखभालीसाठी ठेकेदाराने प्रतिसाद दिल्यानंतर त्याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
महापालिका क्षेत्रात ४७७ उद्याने आहेत. त्यापैकी एकत्रितरीत्या २८६ उद्यानांच्या देखभालीसाठी ठेका देण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी महासभेवर ठेवला होता. परंतु महासभेने एकत्रित ठेका देण्याऐवजी महिला बचत गटांना ठेका देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार प्रशासनाने निविदाप्रक्रिया राबविली असता केवळ १२.५४ टक्के इतकाच बचत गटांचा प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, निविदाप्रक्रियेतील काही अटी-शर्ती शिथिल केल्यानंतर चार निविदा प्राप्त झाल्या. त्यानुसार कपालेश्वर कन्स्ट्रक्शनची सर्वाधिक कमी ३३.७७ टक्के दराची निविदा आल्याने पंचवटीतील ५४ उद्यानांच्या देखभालीचा ठेका देण्यात आला. सदर प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. (प्रतिनिधी)