वाढत्या तक्रारींमुळे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 06:40 PM2019-06-25T18:40:17+5:302019-06-25T18:40:32+5:30
नायगाव: सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्यामुळे स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
नायगाव: सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्यामुळे स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सरपंच वनिता शरद कापडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत येथील स्वस्त धान्य दुकानदार गोपाळ चिंधु बर्के यांच्या विरोधात अनेक ग्रामस्थांनी तक्रारी करत परवाना रद्द करण्याची मागणी केली. गावातील ग्रामस्थांना तीनच दिवस धान्य वाटप करण्यात येते. तसेच ग्रामस्थांना शिधा पत्रिका प्रमाणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारींचा पाढा अनेकांनी वाचला. मुरलीधर बर्के यांनी धान्य दुकानात प्रत्येक महिन्यात किती साठा येतो त्याची तपासणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी करावी. येणाºया धान्य साठ्याचा तपशील दुकाना बाहेरील फलकावर लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच तीन दिवसांत सर्व ग्रामास्थांना धान्य मिळत नसल्यामुळे हा कालावधी किमान पंधरा दिवसांचा करावा अशी मागणी केली.
रेशन दुकानदार बाहेरगावी राहत असल्याने नागरिकांना रेशनसाठी वाट पहावी लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गावातील अनेक शिधा पत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. बंद रेशन धारकांचे रेशनकार्ड आॅनलाईन करण्यासाठी ग्राहकांकडे शंभर ते दीडशे रूपये घेतले जात असल्याची तक्रार मीराबाई मारूती सांगळे, भीमा गाजर पवार यांनी केली. २०१४ साली तयार झालेल्या शिधा पत्रिका धारकांना अजूनही धान्य मिळत नसल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. गावातील सर्व रेशन कार्ड आधार लिंक करण्याची मागणी ही अनेकांनी केली. रेशन घेणाºया ग्राहकांना आॅनलाईन पावती मिळत नसल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी अनेक विषयांबरोबर स्वस्त धान्य दुकान बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच सिन्नरच्या तहसीलदार यांच्या कडे ठराव पाठविण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच सुभाष बर्के, ग्रामसेवक व्ही. एम. लिलके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.