पात्र शाळांना मार्चअखेर अनुदान वितरीत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:07+5:302021-03-25T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : शासन निकषानुसार २० टक्के व ४० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विनाअडथळा ३१ मार्चअखेर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शासन निकषानुसार २० टक्के व ४० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विनाअडथळा ३१ मार्चअखेर अनुदान वितरीत केले जाईल, असे आश्वासन नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिले.
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासमवेत उपसंचालक कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत शाळा अनुदानासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. वार्षिक तपासणी सध्या बंद करावी, तालुक्यातील ज्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, तेथील शाळा बंद कराव्यात, शाळा बंद करून ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवावे, शाळेत शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीचे आदेश काढावेत, अशी विनंती मुख्याध्यापक संघाने यावेळी केली. त्यावर परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याची सूचना उपासनी यांनी केली. तसेच जिल्ह्यातील सर्व अंशत: अनुदानित व नव्याने २० टक्के अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार शाळांच्या अनुदानाचे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी अनेक अडचणींवर सखोल चर्चा झाली. या बैठकीला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस्. के. सावंत, कार्याध्यक्ष एस्. बी. शिरसाट, सचिव एस्. बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, पुरूषोत्तम रकिबे, डी. एस्. ठाकरे, बी. डी. गांगर्डे, किशोर पालखेडकर, बी. के. नागरे, अनिल माळी, दिलीप व्याळीज, सचिन दिवे, एन. वाय. पगार, शरद गीते, दीपक व्याळीज, एस्. एस्. जगदाळे तसेच कृती समितीचे जिल्हाध्यक्ष भारत भामरे, विभागीय अध्यक्ष कांतीलाल नेरे, राजाराम मोरे, गोकुळ महाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.