Nashik: अडचणींवर मात करीत द्राक्ष निर्यात; हंगाम झाला गाेड!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:26 AM2024-04-05T11:26:43+5:302024-04-05T11:27:04+5:30
Nashik News: अनेक अडचणींवर मात करीत हंगामातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.
नाशिक : अनेक अडचणींवर मात करीत हंगामातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे समुद्रामार्गे द्राक्ष नेण्यासाठी कंटेनरचा १२ दिवस वाढलेला प्रवास व त्यामुळे कंटेनरची झालेली भाडेवाढ सोबतच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा बसलेला फटका यामुळे द्राक्ष निर्यात यंदा संकटात सापडली होती. शिवाय हंगाम यंदा एक महिना अगोदरच संपत आहे, असे असतानाही मागील वर्षाच्या तुलनेने २२ हजार क्विंटल अधिक द्राक्षे विदेशी बाजारपेठांमध्ये गेली आहेत.
रमजानमुळे मागणी वाढली
रमजान महिना, आगामी सण, उत्सवांमुळे परराज्यात द्राक्षांचा उठाव वाढला आहे. बांगलादेशला निर्यात होऊ लागल्याने दरात तेजी येण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे थॉमसन, सोनाका प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांनी व्यापारी खरेदी करीत आहेत.
निर्यातक्षम द्राक्षाला दिवाळीत १२ हजार ७०० रुपयांचा दर क्विंटलमागे होता. जानेवारीत पहिला कंटेनर रशियास रवाना झाला होता. तेव्हा थॉमसन जातीच्या वाणाला १२७ रुपये किलो दराचा दर मिळाला हाेता.