युरोपिय देशांमध्ये द्राक्ष निर्यात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 01:50 AM2022-03-05T01:50:36+5:302022-03-05T01:51:11+5:30
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे; मात्र युरोप आणि युक्रेनमध्ये द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू आहे.
नाशिक : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे; मात्र युरोप आणि युक्रेनमध्ये द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू आहे. दरवर्षी रशियामध्ये साधारणत: २४ हजार मेट्रिक टन इतकी द्राक्ष निर्यात होत असते तर युक्रेनमध्ये २३५० ते २४०० मेट्रिक टनांची निर्यात होत असते. युद्ध सुरू होण्यापूर्वीच या देशांमध्ये बऱ्यापैकी माल निर्यात झाला होता. रशियात आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत ६० ते ७० टक्के आणि युक्रेनमध्ये ८०० ते १००० टन मालाची निर्यात झाली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर मात्र संपूर्ण निर्यात बंद झाली आहे. यावर्षी निसर्गाचा द्राक्षाच्या हंगामावर परिणाम झाला आहे. यामुळे माल वेळेत तयार झाला नाही. द्राक्षाच्या एकूण उत्पादनापैकी केवळ ७ ते ८ टक्के मालाचीच निर्यात होत असते. उर्वरित माल देशांतर्गत बाजारपेठेतच विकावा लागत असतो. यावर्षी निसर्गचक्रातील बदलाचा फटका उत्पादकांना बसला आहे. मार्च महिना उजाडल्यानंतर आता उष्णता वाढू लागली आहे, त्यामुळे आता माल तयार होण्याचा वेग वाढेल, यामुळे येत्या काही दिवसांत हंगाम अधिक जोरदार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
कोट-
युक्रेन आणि रशियात जाणारा माल बंद झाला असला, तरी इतर देशांमध्ये सुरळीत निर्यात होत आहे. यामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. ज्यांचा माल अडकला होता, त्यांनी तो इतरत्र वळविला आहे. यामुळे कुणाचेही नुकसान झालेले नाही. - कैलास भोसले, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.