कुंदलगावी शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड, अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 04:34 PM2021-12-14T16:34:08+5:302021-12-14T16:39:03+5:30

मनमाड : मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथे साेमवारी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हातात आलेले द्राक्ष पीक सडून गेल्याने ...

grape farmers worried due to unseasonal rainfall in kundal gaon nashik | कुंदलगावी शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड, अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान

कुंदलगावी शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड, अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान

googlenewsNext

मनमाड : मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथे साेमवारी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हातात आलेले द्राक्ष पीक सडून गेल्याने शेतकऱ्याने दोन एकर द्राक्ष बाग नष्ट केली. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णासारखी द्राक्षाची स्थिती झाल्याने शेतकऱ्याने द्राक्ष पिकावर कुऱ्हाडीचे घाव घातले आहेत. खरीप हंगामाबरोबरच द्राक्ष पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहाटेचे धुके, दुपारचे ऊन आणि सायंकाळचा पाऊस आणि वाढलेली थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष पीक जगवणे मुश्कील झाल्याने द्राक्ष बागायतदार टोकाचे पाऊल उचलत आहेत. बागा वाचविण्यासाठी एकरी वार्षिक १ लाख ५० हजार रुपयांची औषध फवारणी करून देखील हाती काही येईल, याची खात्री उरलेली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या मनमाड शहरापासून जवळच असलेल्या कुंदलगाव ता. चांदवड येथील शंकर कारभारी गांगुर्डे कुंभार या शेतकऱ्याने दोन एकर थामसन जातीच्या द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून बाग तोडून टाकली.

२२ गावांना तडाखा

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील २२ गावांमधील १८७२ शेतकऱ्यांचे ७० हेक्टरवरील कांदा, मका या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पीक मातीमोल झाले असून त्यात कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दव, धुके आणि रिमझिम पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

लाखो रुपयांची गुंतवणूक करून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण आणि वाढती थंडीमुळे द्राक्ष बाग टिकवणे हालाखीचे झाले असून सलग तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्याने संतापून द्राक्ष बागेवर कुऱ्हाडीचे घाव घालण्याची वेळ आली आहे.

- शंकर कारभारी गांगुर्डे, शेतकरी

 

 

Web Title: grape farmers worried due to unseasonal rainfall in kundal gaon nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.