ढगाळ वातावरणाने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 07:01 PM2020-12-12T19:01:06+5:302020-12-12T19:02:24+5:30
पिंपळगाव बसवंत : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ तर माण्यांना तडे जाण्याची दाट शक्यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पिंपळगाव बसवंत : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ तर माण्यांना तडे जाण्याची दाट शक्यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत आहे. बुधवारी १२.४ गुरुवारी १६.८ तर शुक्रवारी २९.२ व कमीतकमी १८.० तापमान होते तर शनिवारी २८.२ व कमीकमी १७.४ बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षपिकाला बसण्याची शक्यता आहे.
फुलोरा अवस्थेमध्ये असलेल्या बागांमध्ये द्राक्षकूज, मणीगळ होण्याची शक्यता आहे. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर द्राक्षबागेमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने बागायतदार धास्तावले आहेत. आधीच यावर्षी द्राक्ष उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यातच बदलत्या हवामानाचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या परिपक्व झालेल्या द्राक्षबागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो. मागीलवर्षी अति पावसामुळे आणि बागेत पाणी साचल्याने द्राक्षाचे घड जिरल्याची समस्या दिसून आली. त्यातून शेतकऱ्यांनी आपल्या बागा बचावल्या मात्र कोरोनाच्या महामारीत निर्यातक्षम द्राक्ष कवडीमोल विकावी लागली. आणि पुन्हा चालू वर्षी आस्मानी सुलतानी संकट उभे राहून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे.
ढगाळ वातावरणामुळे द्राक्षकूज, मणीगळ ही समस्या दिसणार आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे त्यासही ड्रीप व स्प्रेने कॅल्शियम द्यावे.
- सुनील गवळी, द्राक्ष शेती सल्लागार.