दिंडोरीतील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:12 PM2020-04-15T23:12:53+5:302020-04-15T23:13:11+5:30
निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.
लखमापूर : निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.
द्राक्षपंढरीवर वारंवार येत असलेल्या निसर्गाच्या कोपाने व अस्मानी व सुलतानी संकटाने निसर्गाच्या दुष्टचक्रापुढे द्राक्षपंढरी हतबल झाली असून, द्राक्ष शेती करणे दिवसेंदिवस अवघड व जिकिरीचे बनत चालले आहे. परकीय व नगदी चलन मिळवून देण्याच्या चवीने जागतिक बाजारपेठ काबीज केलेल्या जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या खर्चिक व महागड्या द्राक्ष पिकाला अवकळा आली आहे. द्राक्ष पिकांबरोबर इतर पिके घेणारा शेतकरी लॉकडाउनमुळे कचाट्यात सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जनजीवन ठप्प
झाले असून, दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनामुळे द्राक्ष विक्री व्यवसाय बंद झाल्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतातच द्राक्ष असून, शेतकरी चिंतित आहेत. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, परमोरी, दहेगाव, वागळूद, ओझे, करंजवण,ओझरखेड, पुणेगाव, दहिवी, कोशिंबे, अवनखेड, कादवा म्हाळुंगी, म्हेळुस्के ही गावे द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर आहेत; परंतु सद्यस्थितीला या गावातील द्राक्षबागा विक्र ीअभावी उभ्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण देशात लॉकडाउन केल्यामुळे व शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे या मालाची विल्हेवाट लावायची कशी? या विवंचनेत द्राक्ष उत्पादक सापडले आहेत.
स्थानिक व्यापारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्यासारख्या मालाला कवडीमोल दराने देऊन जे पदरी पडेल त्या भावाने द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष माल द्यायला तयार असून, द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करून माल खरेदी करून बाहेर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र द्राक्षमालाच्या गाड्या अडविल्या जातात. त्यामुळे द्राक्ष व्यापाºयांनी द्राक्ष काढणी बंद केली आहे. या सर्वच गोष्टींमुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून, बळीराजाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या संकटातून बळीराजा कसा बाहेर येईल यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना आणून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा ही मागणी जोर धरीत आहे.
माल विकला गेला तरच चार पैसे हाती लागतील व आपल्यावर असलेल्या सोसायटी, बँक, पतसंस्था व अन्य ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडता येईल. तसेच घरात मंगल कार्य अथवा देणे-घेणे करता येईल या भरवशावर आज ना उद्या यातून मार्ग मिळेल, शासन आपल्याला मदत करेल याची या शाश्वती असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शासन यावर काय निर्णय घेते याचीच वाट बघत आहेत.