संततधार पावसाने द्राक्ष उत्पादक चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:09 AM2019-10-21T00:09:12+5:302019-10-21T00:35:26+5:30
निफाड तालुक्यात शुक्रवारपासून आलेले ढगाळ वातावरण अन् शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
निफाड : तालुक्यात शुक्रवारपासून आलेले ढगाळ वातावरण अन् शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
निफाड तालुक्यात गेल्या १५ दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे वेगाने सुरू असतानाच शुक्रवारपासून पुन्हा वातावरण बदलले आहे. शनिवारी रात्री जोरदार तर रविवारी दिवसभर संततधार पाऊस झाला. यामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. फुलोºयात असलेल्या द्राक्षबागांना बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. अजून दोन दिवस पाऊस अन् ढगाळ हवामान कायम राहणार असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.
निफाड तालुक्यातील उगाव, शिरवाडे, वनसगाव, शिवडी, खेडे, सोनेवाडी, सारोळे, दावचवाडी, खडकमाळेगाव, सावरगाव, रानवड, नांदुर्डी, नैताळे, शिवरे आदी भागात द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्या वेगाने सुरू आहे. अनेक द्राक्षबागा कोवळा फुटवा पोंगा अवस्थेत आहेत तर लवकर छाटणी झालेल्या बागा फुलोरा अवस्थेत आहेत. द्राक्षबागांच्या मशागतीची कामे गतीने सुरू आहेत त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान अन् द्राक्ष उत्पादक गावात कोसळलेल्या पावसामुळे द्राक्षबागांवर बुरशीजन्य डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्याचबरोबर नवीन फुटव्यातील द्राक्षघड जिरणेचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर नवीन निघालेला द्राक्ष घडाची गोळी होण्याचे संकटही द्राक्ष उत्पादकांसमोर उभे आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढत आहे. नियमित कराव्या लागणाºया रोगप्रतिकारक औषधांच्या फवारणीपेक्षा अधिक फवारणी करावी लागत आहे. एका ऐवजी तीन तीन फवारणी होत असल्याने खर्च वाढला आहे.
सोयाबीन सोंगणीला आले आहे. त्याचा पाला खराब होतोय, ज्यांनी सोयाबीन सोंगणी करून शेतात ठेवली आहे ती सोयाबीन खराब होण्याचा धोका वाढला आहे. सध्या भाव चांगले असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी खुश होते पण पाऊस सुरू झाल्याने पाला खराब होऊन टमाटा खराब होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा परिणाम दरावर होईल. लाल कांदाही काही ठिकाणी काढणीला आला आहे, त्यावरही परिणाम होऊन उत्पादन घटेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी दिवसभर संततधार पाऊस पडत असल्याने निफाड तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते.