यंदा जिल्ह्यात वाढणार द्राक्षांची गोडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:55+5:302020-12-03T04:25:55+5:30
सायखेडा : निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये नाशिकच्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यात होणाऱ्या द्राक्षांची आणि देशांतर्गत ...
सायखेडा : निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये नाशिकच्या द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यात होणाऱ्या द्राक्षांची आणि देशांतर्गत बाजारपेठेतील द्राक्षांसाठी रेप नेट ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदणी केली जाते. ३० नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील २६ हजार २०७ हेक्टरी द्राक्षबाग भागाची राज्यातील सर्वाधिक नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा देशाच्या तुलनेत नाशिकची सर्वाधिक द्राक्ष आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये जाणार असल्याने नाशिकच्या द्राक्षांची गोडी वाढणार असल्याची माहिती तांत्रिक विभागाचे सल्लागार गोविंद हांडे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात शेतीसंदर्भातील अर्थकारणात सर्वात मोठी उलाढाल द्राक्ष पिकात होत असते. जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, बागलाण, सिन्नर व येवला तालुक्यातील काही भाग या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षाचे पीक घेतले जाते. द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात सर्वाधिक लागवड असून, त्याखालोखाल दिंडोरी आणि नाशिक तालुक्याचा क्रमांक लागतो. शेती उत्पादनातील सर्वात महागडे आणि जिकिरीचे पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते. एक वर्षाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी किमान दोन लाख रुपये खर्च येतो. वर्षाला इतका खर्च करूनदेखील अवकाळी पाऊस तर कधी गारपीट या वातावरणाचा परिणाम होत असल्याने अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदादेखील द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासूनच मोठा संकटांचा सामना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अवकाळी आणि बेमोसमी पावसाने थैमान घातले असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष पिकाची नोंदणी झाल्याने कृषी विभागाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अर्ली द्राक्षांचे नुकसान
ऑगस्ट महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागांना अवकाळी आणि बेमोसमी पावसाने झोडपले. गळ आणि कूज समस्या मोठ्या प्रमाणात आल्याने हंगामाच्या सुरुवातीला छाटणी झालेल्या द्राक्षबागा बहुतांशी भागांमध्ये वाया गेली आहेत. जवळपास २५ टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने सुरुवातीपासून द्राक्षांना चांगले बाजारभाव राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून, स्थानिकसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना चांगली मागणी असणार आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. यंदा सरकारी धोरण आणि अडथळे आले नाहीत तर शेतकऱ्यांना चार पैसे चांगले मिळतील.
- डॉ. वसंत ढिकले
अध्यक्ष, द्राक्ष विज्ञान मंडळ