फसवणूकप्रकरणी द्राक्ष व्यापाऱ्याला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 02:04 AM2022-04-29T02:04:42+5:302022-04-29T02:04:57+5:30
चांदवड तालुक्यातील पिंपळणारे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी द्राक्षमाल घेत फसवणूक केलेल्या खेडगाव येथील व्यापारी तुषार भास्कर दवंगे यास सुमारे १७ लाख ९१ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चांदवड न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश एन. ए. इंगळे यांनी फसवणूक करणाऱ्या दवंगे यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे फसवणूक करून तुरी देणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
चांदवड : तालुक्यातील पिंपळणारे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी द्राक्षमाल घेत फसवणूक केलेल्या खेडगाव येथील व्यापारी तुषार भास्कर दवंगे यास सुमारे १७ लाख ९१ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चांदवड न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश एन. ए. इंगळे यांनी फसवणूक करणाऱ्या दवंगे यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे फसवणूक करून तुरी देणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील शेतकरी बाळासाहेब देवराम कोठुळे यांनी २०१७ साली वणी येथील व्यापारी तुषार दवंगे याच्या तुषार व्हेजिटेबल कंपनीला ४३५० प्रति क्विंटल या दराप्रमाणे द्राक्ष विकले होते. त्या बदल्यात त्यांनी पिंपळगाव येथील एच.डी.एफ.सी. बँकेचे तीन धनादेश कोठुळे यांना सुपुर्द केले. दिलेल्या तारखेस द्राक्ष उत्पादक बाळासाहेब कोठुळे यांनी ते बँकेत जमा केले असता ते वठले नाही. काही दिवस तगादा केल्यानंतर या व्यापाऱ्याकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून कोठुळे यांनी न्याय प्रक्रियेद्वारे जाण्याचा निर्णय घेतला. सुमारे पाच वर्षांनंतर सदर शेतकऱ्याला न्याय मिळाला असून आरोपी दवंगे यास चांदवड न्यायालयाने कारावास सुनावल्यानंतर इतरही फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकऱ्याच्या वतीने ॲड. पी. पी. पवार यांनी न्यायालयात बाजू मांडली.
चौकट...
चेक बाऊन्स केल्यास तो गुन्हा
न्यायालयाने निकाल देताना पहिल्याच ओळीत बॉल बाऊन्स केल्यास तो खेळ समजला जातो, पण चेक बाऊन्स केल्यास तो गुन्हा असल्याचे कडक ताशेरे ओढले आहेत. आरोपी दवंगे यास चेक बाऊन्सप्रकरणी झालेली सहा महिन्यांची शिक्षा टाळायची असेल तर त्यास सिक्युरिटी बाँड सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आतापर्यंत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जात असून यामुळे मोठी जरब व्यापाऱ्यांना बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोट...
माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांकडून या द्राक्ष व्यापाऱ्याने माल घेऊन फसवणूक केली होती. मात्र उशिरा का होईना साडेचार वर्षांनंतर मला न्यायदेवतेने न्याय मिळवून दिल्याने मनस्वी आंनद होत आहे. असे अनेक शेतकरी आहेत, त्यांची फसवणूक होऊ नये याकरिता अशा व्यापाऱ्यांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा.
- बाळासाहेब कोठुळे, शेतकरी, पिंपळणारे