द्राक्षपंढरीत गारपीट, उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:20+5:302021-03-21T04:14:20+5:30
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्याची द्राक्षे पंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत परिसरात शनिवार, दि. २० रोजी दुपारी साडेतीन ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्याची द्राक्षे पंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत परिसरात शनिवार, दि. २० रोजी दुपारी साडेतीन च्या सुमारास जोरदार गारपिटीसह अवकाळी पावसाने द्राक्ष काढणी, सोंगणीसाठी आलेले गहू, हरभरा पीक जमीनदोस्त झाले असून भाजीपाला पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह निसर्गाच्या या अस्मानी व सुलतानी संकटात उभारी घेणाआ शेतकरी पुन्हा मेटाकुटीस येणार आहे.
जिल्ह्यात द्राक्ष माल पक्व होत असताना वादळ-वारा व पाऊस तर गारपीट यामुळे द्राक्षाचे घड तुटून पडले. तर काही बागा आडव्या झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्यासह प्रतवारी बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासह वेलवर्गीय भोपळा, काकडी, कारली या पिकांना फटका बसला आहे. कांदा पिकासह सोंगणीसाठी आलेल्या गहू, हरभरा पिकाचे नुकसान वाढले आहे. या गारपिटीचा फटका पिंपळगाव, मुखेड, बेहड, पाचोरे, आहेरगाव, पाचोरे वणी, लोणवडी, पालखेड नारायण, टेम्भी आदी गावांतील भागात बसला आहे.
--------------------------
मागील संकटातून उभारी घेतो नाही तर लगेच गारपीट, पावसाने पुन्हा मेटाकुटीला आणले. होते नव्हते तेवढे गेले. आजच द्राक्ष काढणीला सुरुवात केली होती आणि गारपिटीने द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान केले. शासनाने दखल घ्यावी.
- गणेश देशमुख, द्राक्ष उत्पादक
........................
मागील अवकाळीत बागेचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण द्राक्ष बाग सडून गेली होती. त्या बागेचा तोटा दुसऱ्या बागेत भरून निघेल असे वाटत होते. त्यासाठी द्राक्ष काढणी आजपासून सुरू केली असता पॅकिंग चालू असताना पावसासह गारपीट सुरू झाली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील नुकसानाचीच प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही आणि पुन्हा आता मोठे नुकसान झाल्याने नव्याने संकट उभे राहिले आहे.
- राजेंद्र विधाते, द्राक्ष उत्पादक
--------------------------
आहेरगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश देशमुख यांच्या बागेचे झालेले हाल. (२१ पिंपळगाव २ ते ४)
---------
मातेरेवाडी परिसरात गारांचा पाऊस
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी परिसरात दुपारी आज अचानक गारांचा पाऊस पडल्याने बळीराजाला पुन्हा एकदा डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी अचानक गारांचा जोरदार पाऊस पडल्याने द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाचा जीव टांगणीला लागला आहे. पालखेड बंधाऱ्यांच्या पुढे एम.आय.डी.पासुन ते झिरो पाॅइंट, जाधव वस्ती या ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस पडला. या बेमोसमी पावसाचे आगमन अचानक झाल्याने द्राक्षे काढणीत व्यस्त असलेल्या शेतकरी वर्गाची मोठी धावपळ उडाली. तसेच द्राक्षे हंगाम मध्यावर असताना या अवेळी येणाऱ्या बेमोसमी पावसाचा बळीराजाने धसका घेतला आहे. या चिंतेत बळीराजा सापडला आहे. तालुक्यातील वरखेडा, लखमापूर, खेडगाव आदी ठिकाणी ही या बेमोसमी पावसांचे तुरळक आगमन झाल्याने आता पुढे काय, असा सवाल शेतकरी वर्गासमोर आ-वासून उभा राहिला आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त असताना आज परत तालुक्यातील द्राक्षे पंढरीवर निर्सगाने आपली वक्रदृष्टी टाकल्याने आपली सुटका कशी होईल, या भीतीने बळीराजा चिंताक्रांत बनला आहे.
------------------------