द्राक्षाला तडे...कांदा सडतोय, तर गहू भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 07:01 PM2021-02-20T19:01:45+5:302021-02-20T19:03:34+5:30
जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.
जळगाव नेऊर : गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व पहाटेपासून धुके आणि दव यामुळे पाणी उतरलेल्या द्राक्षबागा व कांदा पीकही जमिनीत सडत आहे तर लागवड केलेला उन्हाळा कांदा करपा, मावाच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्याने भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्याने हिरावून नेला आहे.
सध्या अनेक शेतकरी द्राक्ष बागेसाठी व्यापारी शोधत असून पंधरा ते वीस रुपये व्यापारी द्राक्षबागेला मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा भाव वाढतील या आशेने लावून धरल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांची द्राक्ष बागेची बहुतेक कामे आटोपते आल्याने शेतकऱ्यांना आता पडत असलेल्या वादळी वारा, पाऊस व धुके पडत असलेल्या दवाने द्राक्षाच्या मण्यांना तडे जात आहे. अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांवर संकटावर संकट येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
द्राक्षबागेला औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके यांचे अति प्रमाणात झाल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेला अडचणी निर्माण होत आहे. या संकटावर मात करून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. गेली तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण व गुरुवारपासून वादळी वारे व पाऊस यामुळे अनेक द्राक्ष बागांना फटका बसला आहे. यामुळे द्राक्ष बागेला भरमसाठ खर्च करावा लागत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
काढणीला आलेला कांदा शेतातच सडला
द्राक्ष पाठोपाठ शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते पण कांदा पीकही करपा, मावा, तुडतुडेच्या विळख्यात सापडल्याने व काढणीला आलेला कांदा शेतातच सडत आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला शेतकरी औषधांवर औषधे फवारणी करुनही पाहिजे, असे उत्पादन लाल कांदा पिकातून निघत नसल्याने तसेच कांद्याला मिळत असलेला भाव हा शेतकरीवर्गाला खूश करत असला तरी शेतकरीही कांदा पिकावर भरमसाठ खर्च करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
मागील वर्षी कोरोनाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने या वर्षीही द्राक्षबागेच्या छाटणीपासून सुरू झालेली संकटाची मालिका अजूनही सुरूच आहे. भरमसाठ खर्च होऊनही पीक हाती येते की नाही याची शाश्वती राहिली नाही. सुरुवातीलाच पावसामुळे घडामध्ये कुज झाल्याने उरल्यासुरल्या द्राक्षबागेवरही वादळी वारा व पावसाने मारा केल्याने द्राक्ष बागा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मोठा खर्च होत असून संकटावर संकट येत आहे.
- बाबासाहेब शिंदे, द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊर