द्राक्षाला मिळतोय कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 10:22 PM2021-03-11T22:22:48+5:302021-03-12T00:37:08+5:30
जळगाव नेऊर : दर्जेदार द्राक्ष मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून अनेकांनी नैराश्यपोटी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालविण्याची मानसिकता केली आहे.
जळगाव नेऊर : दर्जेदार द्राक्ष मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून अनेकांनी नैराश्यपोटी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालविण्याची मानसिकता केली आहे.
शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या दर्जेदार द्राक्षबागेला १९८० सालचा दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही कोरोनाच्या सावटाखाली सापडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जुन्याजाणत्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८० सालातसुद्धा दहा ते पंधरा रुपये दराने द्राक्ष विकली जात होती पण त्यावेळेस औषधांचा खर्च कमी होता. आता मात्र खते, औषधांचे वाढलेले दर, मजुरीचे वाढलेले दर पाहता शेतकरी ऐन हंगामात संकटात सापडला आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा व्यापाऱ्यांअभावी, तर कधी वाहतूक बंदमुळे अडचणीत आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेवर मनुके तयार झाले. मागील वर्ष कोरोना संकटात गेलेले असतानाच दुसरे वर्ष ही कोरोना संसर्ग साथीच्या सावटाखाली चालल्याने शेतकरी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविण्याच्या मानसिकतेत आहेत.
अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा या पाच महिन्याच्या होत असल्याने आहे त्या भावात द्राक्षबागा द्याव्या लागत आहेत. पुढील वर्षासाठी काडी चांगली होण्यासाठी थोडी विश्रांती देऊन छाटणी करावी लागणार आहे. सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सप्ताहात दहा रुपयांपासून द्राक्ष विक्री करावी लागली असून निर्यातक्षम मालाला ३५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
फोटो - १० ग्रेप्स
जळगाव नेऊर परिसरात कडाक्याच्या उन्हात सुरू असलेला द्राक्ष बागेचा खुडा.