अवकाळी पावसाने द्राक्ष, लाल कांद्यावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:20+5:302021-01-08T04:41:20+5:30

मानोरी : येवला तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना अचानक अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने ...

Grapes, red onions on unseasonal rains | अवकाळी पावसाने द्राक्ष, लाल कांद्यावर संक्रांत

अवकाळी पावसाने द्राक्ष, लाल कांद्यावर संक्रांत

Next

मानोरी : येवला तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असताना अचानक अवकाळीच्या सरी कोसळू लागल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत असल्याचे दिसून आले आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड , जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण, दाट धुके आणि अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडली असून, कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.अनेक ठिकाणी लाल कांदा काढणीला आला असून, काही ठिकाणी सुरुवातदेखील केली आहे. अशातच अवकाळी पावसाच्या धास्तीने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला असल्याचे सर्वत्र दिसून आले आहे.

ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरीदेखील पूर्णतः धास्तावला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसांत द्राक्षघड तोडणीला सुरुवात होणार आहे. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्षबागांना वारंवार औषध फवारणी करून चांगल्या प्रकारे फळेदेखील लागली आहेत.

-----------

महागड्या औषधांची फवारणी

वातावरणातील बदलामुळे सातत्याने महागडी औषध फवारणी करून द्राक्षबाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. गत तीन ते चार दिवसांत मानोरी परिसरात दोनदा अवकाळीच्या सरी कोसळल्या असून, त्यात पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष फळावर पाणी साचून मण्यांवर काळे डाग पडत आहे. यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

--------------

द्राक्ष काढणी अंतिम टप्प्यात

द्राक्ष फळ हे वर्षातून एकदा येते असल्याने वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी मागील तीन ते चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होणार असल्याने त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

---------------

तोडणीला आलेली द्राक्षबाग, काढणीला आलेला लाल कांदा. (०७ मानोरी १/२)

===Photopath===

070121\07nsk_10_07012021_13.jpg

===Caption===

०७ मानोरी १

Web Title: Grapes, red onions on unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.