वणीतील द्राक्षे गेली परदेशात
By admin | Published: January 16, 2017 12:38 AM2017-01-16T00:38:56+5:302017-01-16T00:39:07+5:30
कॅशलेस : राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून व्यवहार
वणी : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असणारा दिंडोरी तालुका सर्वत्र परिचित असून, तालुक्यातील अनेक उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करून नावलौकिक कायम ठेवला आहे. यावर्षीही वणी परिसरातील निर्यातक्षम द्राक्षे युनायटेड किंगडम येथे निर्यात करून वणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून सुधाकर घडवजे यांनी वणीचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे.
२८ एकर द्राक्षबाग असलेल्या घडवजे यांनी १९ एकरमध्ये युरो गॅप प्रणालीनुसार निर्यातक्षम सिडलेस थॉमसन द्राक्षे उत्पादित केली आहेत. रेसिड्यूमुक्त द्राक्ष तपासणी अहवालासाठी पुणे, बेंगळुरू, हैदराबाद येथील प्रयोगशाळेत कृषी विभागामार्फत नमुने पाठविण्यात येतात. सुमारे पाच किलो वजनाची द्राक्षे नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येतात. अहवाल आल्यानंतर निर्यातदारांच्या माध्यमातून सदरची द्राक्षे परदेशात पाठविण्यात
येतात. वणी-कळवण रस्त्यावर असलेल्या द्राक्षबागेतून सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत द्राक्षांची खुडणी करण्यात येते. सकाळच्या सुमारास द्राक्ष खुडणीसाठी अनुकूल तपमान असते. निर्यातदारांचे प्रशिक्षित कर्मचारी खुडणीची कामे करतात. ३० कर्मचाऱ्यांचा समूह निर्धारित कालावधीत सुमारे १०० क्विंटल द्राक्षांची खुडणी करतात. १७ ते २२ एमएम आकारमान द्राक्षाचे असते. ९ किलो क्षमतेच्या प्लॅस्टिक कॅरेटमध्ये द्राक्ष ठेवण्यात येतात. या द्राक्षांची वाहतूक करून प्रिकूलिंग सेंटर स्टोरेज युनिटमध्ये पाठविण्यात येतात. तत्पूर्वी या द्राक्षांची पुन्हा प्रतवारी करण्यात येते. एकसारख्या आकारमानाची द्राक्षे आयात केलेल्या बॉक्समध्ये ७०० ग्रॅम वजनाची द्राक्षे विशिष्ट प्रकारच्या पारदर्शी कागदाच्या आवरणात ठेवण्यात येतात.
राष्ट्रीयीकृत बँकेच्या धनादेशाच्या माध्यमातून खरेदी-विक्र ीचे व्यवहार पार पडतात. ७० ते १२० रु पये प्रती किलोचा दर प्रतवारी व दर्जा पाहून ठरविला जातो. दरम्यान, जयवंत देशमुख यांची द्राक्षे बांगलादेशात, बाळासाहेब घडवजे यांची द्राक्षे रशियाला तर आता सुधाकर घडवजे यांची द्राक्षे युनायटेड किंगडमला पोहोचल्याने वणीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. (वार्ताहर)