हातातोंडाशी आलेला घास हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:58 PM2020-03-27T22:58:25+5:302020-03-27T22:59:30+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच लॉकडाउन व संचारबंदीमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतमालाचे भाव घसरलेले होते, बाजार समित्याही बंद झाल्यात तर खरेदीदार व्यापारीवर्गानेही लॉकडाउन केल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, शेतात साठवलेला कांदा, सोंगणीला आलेला गहू, हरबरा आणि भाजीपाला अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच लॉकडाउन व संचारबंदीमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतमालाचे भाव घसरलेले होते, बाजार समित्याही बंद झाल्यात तर खरेदीदार व्यापारीवर्गानेही लॉकडाउन केल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, शेतात साठवलेला कांदा, सोंगणीला आलेला गहू, हरबरा आणि भाजीपाला अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
शहर आणि तालुका परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, या तीन दिवसात तालुक्यात अवकाळी पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली. काही भागात विजेच्या कडकडाट व वादळीवाºयासह चांगलाच पाऊस बरसला तर काही भागात शिडकावा झाला. येवला शहरासह तालुक्यातील नगरसूल, पाटोदा, अंदरसूल, सायगाव, कातरणी, धामणगाव, अनकाई, नागडे, गारखेडा, मानोरी, देशमाने आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात असणारा पाऊस गुरुवारी मध्यरात्री व शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मात्र वादळीवाºयासह जोरदार बरसला. यामुळे तालुक्यातील फळबागा, भाजीपाला, कांदा, गहू, मका उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला. अगोदरच वेगवेगळ्या कारणाने पुरता मेटाकुटीला आलेला शेतकरी या अवकाळीच्या अस्मानी संकटाने अधिकच हवालदिल झाला आहे.
कोरोनामुळे कांदे, डाळिंब, गहू, हरभरा, द्राक्षे व भाजीपाला यांचे बाजारभाव पडले आहेत. शेतात तयार झालेला शेतमाल कसा आणि कुठे ठेवावा, असा प्रश्न समोर असताना अवकाळी पावसाचे दिलेल्या दणक्याने कांदे, मका, हरभरा तसेच कणीस आलेल्या गहू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संचारबंदीने शेतात काढणीस आलेला गहू काढायला हार्वेस्टिंग मशीनही मिळत नाही त्यामुळे गव्हाचे काय करायचे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा राहिलेला आहे. उत्तर-पूर्व भागातील गारखेडा, अंगुलगाव, तळवाडे, राजापूर, ममदापूर, सुरेगाव, गवंडगाव परिसरात शेतकºयांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संचारबंदीमुळे वाहनचालक शेतमाल बाजारात घेऊन जायला तयार नाहीत. त्यात बाजार समितीही बंद त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अवकाळीच्या फटक्याने शेतात काढून ठेवलेला विक्री योग्य कांदा भिजला तर काढणीला आलेला गहूही जमीनदोस्त झाला आहे. याबरोबरच मका, हरभरा आणि भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकणी काढणीला आलेला कांदे ही वादळी वाºयाने भुईसपाट झाले आहेत. त्याचप्रमाणे डाळिंब फळे खाली पडल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
अवकाळीने द्राक्षबागांचे नुकसान
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव, आहेरगाव, पाचोरे वणी, शिरवाडे, लोणवाडी, नारायण टेंभी, मुखेड, अंतरवेली या भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यात पाचोरे वणी येथील शेतकरी संजय कारभारी वाळुंज यांची एक एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली. तसेच परिसरातील शेतकºयांचे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांसह आंब्याचा मोहरही झडला आहे. वाळुंज यांची एक एकर द्राक्षबाग देण्यात आली होती. त्याचा रशियासाठी व्यवहारदेखील झाला होता. परंतु लॉकडाउन झाल्याने व्यापाºयाने माल खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे वाळुंज यांनी द्राक्षमालाचा बेदाणा करायचे ठरविले होते. परंतु बुधवारी (दि. २५) झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळुंज त्यांची द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. तलाठी यांच्या अहवालानुसार नऊ लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तलाठी अमोल निकुंभ, कृषी अधिकारी चंद्रकांत गांगुर्डे, पोलीसपाटील विजय वाळुंज, ग्रामसेवक रामकृष्ण आहेर, नरेंद्र वाटपाडे, सोमनाथ वाटपाडे आदींनी पंचनामा केला. याप्रसंगी शेतकरी संजय वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, बापू वाळुंज, प्रसाद वाळुंज, विठ्ठल आव्हाड आदी उपस्थित होते.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
सायखेडा : बेमोसमी पावसाने द्राक्षपंढरीतील हजारो हेक्टर बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकºयांना लाखो रु पये फटका बसला आहे. द्राक्षबागा पडल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले असून, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाने कहर घातला असून, भेंडाळी, शिंगवे, करंजगाव, सोनगाव येथील द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. भेंडाळी येथील भाऊसाहेब कमानकर, शिंगवे येथील सचिन डेर्ले यांच्या प्रत्येकी दीड एकर जमीनदोस्त झाल्या तर इतर गहू, मका, कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. यामुळे या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
निफाड परिसरात पिकांचे नुकसान
निफाड : शहरासह परिसरात शुक्र वारी (दि. २७) अवकाळी पावसाने पुन्हा झोडपल्याने द्राक्ष, गहू व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. निफाड, जळगाव, शिवरे, श्रीरामनगर, नैताळे, गाजरवाडी परिसरास पावसाने झोडपले. सोंगणीला आलेला गहू भिजल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने एकवीस दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष विक्र ीचा प्रश्न निर्माण होत असतानाच गुरु वार व शुक्र वारी पावसाने झोडपून काढल्याने द्राक्ष बागायतदार चिंतित झाले आहेत.
आमच्या शेतात जास्त प्रमाणात कांद्याचे पीक घेत असतो; पण या वादळी पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीने या वर्षी शेतमालाच्या वजनात आणि दरातपण मोठी घट होणार आहे. त्यामुळे शेतक्यांना मोठे नुकसान सहन करावा लागणार आहे. - विजय खैरनार, शेतकरी, गारखेडा
द्राक्षबाग उन्मळून पडल्याने मोठे नुकसान
निफाड : श्रीरामनगर येथील संजय रावसाहेब काळे यांचा काढणीला आलेला द्राक्षबाग उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर कांद्यावर ढगाळ वातावरणामुळे करपा व इतर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढल्याने कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढणार असल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे.