ग्रामीण भागात गवतविक्रीतून साधला जातोय रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:55+5:302021-08-27T04:18:55+5:30
▪️गवत विक्रीतून मिळकतीचे साधन मिळकतीचे साधन, जनावरांच्या चाऱ्याची सोय देवगांव (तुकाराम रोकडे) : सर्वत्र ठिकाणी शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे ...
▪️गवत विक्रीतून मिळकतीचे साधन
मिळकतीचे साधन, जनावरांच्या चाऱ्याची सोय
देवगांव (तुकाराम रोकडे) : सर्वत्र ठिकाणी शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या हाताला कोठेच काम मिळेनासे झाल्यामुळे पावसाळ्यात निर्माण झालेले गवत नागरिकांना रोजगार मिळवून देत आहे. ग्रामीण भागात शेतजमीन शिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करीत असल्याचे चित्र सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या देवगांव परिसरात पाहावयास मिळत आहे.
वर्षाचे बाराही महिने येथील नागरिकांना रोजगारासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्र्यंबकेश्वर तालुका आणि रोजगारासाठी नागरिकांचे होणारे स्थलांतर हे जणू काही समीकरणच बनले आहे. उन्हाळ्यात कधी वीटभट्टी तर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर तर पावसाळ्यात भातपिकासह नागली, वरई आदी पिकांची लागवड, तसेच लागवडीची कामे करत असतात. सध्या शेतीतील कामे जवळपास संपली असल्याने माळ, रानातील गवत कापून, त्याची विक्री करून मिळकत मिळविण्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपल्याला रोजगार कसा मिळणार? आपला उदरनिर्वाह कसा करायचा? ही चिंता सातत्याने भेडसावत असते. मात्र दरवर्षी पावसाळ्यामुळे तयार होणाऱ्या गवतामुळे आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न सुटत असतो. सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहेत. शहरातील मोठे तबेलेवाले व इतर व्यक्ती मोठ्या प्रमाणात गवताची खरेदी करत असून यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.
पावसाळ्यातील शेतातील पिकांची लागवडीची कामे पूर्ण झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या हाताला कोणोही काम शिल्लक नसते. त्यामुळे कुटुंबावर रोजीरोटीचा प्रश्न उभा राहतो. असंख्य अडचणींचा सामना करत आयुष्याची गुजराण करण्यासाठी येथील नागरिक धडपडत असतो. त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर गणला जातो. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गाच्या किमयेमुळे माळरानावर सर्वत्र हिरवेगार गवत तयार झाले असल्याने हे गवत गाय, म्हैस आदी दुधाळ जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून तबेलाधारकांची या गवतासाठी मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिक गवताच्या विक्रीतून मिळकत मिळवताना दिसत आहेत.
-----------------
असा मिळतो रोजगार
दिवसभर गवत कापून संध्याकाळपर्यंत गवताची गाडी भरून देण्याचा दिनक्रम सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. या गवताच्या विक्रीतून प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये मिळत असून दिवसभरातून कसाबसा दोनशे ते अडीचशे रुपयांचा रोजगार मिळत आहे. गवतविक्रीतून मिळणारी मिळकत तुटपुंजी जरी असली तर त्यातून दररोजचा खर्च भागला जातो आहे. त्यामुळे शेतीची कामे उरकल्यानंतर गवताच्या कापणीकडे येथील नागरिक लक्ष केंद्रित करत असतो. त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून समाधान मिळते. तालुक्यातील देवगांव परिसरात चंद्राचीमेट, आव्हाटे, देवगांव, टाकेहर्ष, पुलाचीवाडी, वाघ्याचीवाडी, शेंड्याचीमेट या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गवताची विक्री होताना दिसते.
(२६ देवगाव)
260821\26nsk_12_26082021_13.jpg
२६ देवगाव