ग्रामीण भागात तीव्र संताप
By admin | Published: February 4, 2017 01:15 AM2017-02-04T01:15:10+5:302017-02-04T01:19:18+5:30
प्रादेशिक परिवहन विभाग : दर महिन्याला होणारे तालुकास्तरीय शिबिरे बंद
येवला : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्याकडून प्रत्येक महिन्यात ग्रामीण भागातील जनतेच्या कामासाठी शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र आता फेब्रुवारी २०१७ पासून सदर शिबिरे घेण्याचे बंद करण्यात आल्याचे कार्यालयाने जाहीर केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
महिन्याच्या नियोजनाप्रमाणे परिवहन अधिकारी येवल्यात विश्रामगृह परिसरात आले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शिकाऊ परवाना देण्याचे काम होणार नाही, असे त्यांनी सांगितल्याने येथे आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आता शिकाऊ परवाना काढण्यासाठी संबंधितांना आॅनलाइन अपॉइण्टमेंट घेऊन नाशिक येथे जावे लागणार आहे. त्यात वेळ व आर्थिक नुकसानही होणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येक महिन्याला शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरांचे वेळापत्रक कार्यालयाने आगोदरच जारी केले आहे. त्यानुसार आज येथील शासकीय विश्रामगृहावर शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात नेमकी कोणती कामे होणार, हे निश्चित नसल्याने परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने विश्रामगृह येथे हजर होते.
येत्या काही दिवसात पोलीस विभाग व परिवहन विभाग यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. या दोन्ही विभागात चालक वाहन परवाना बंधनकारक असल्यामुळे आज येथे इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र काम न झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. परिवहन कार्यालयाने अचानकपणे निर्णय घेतला असून, प्रसिद्धिमाध्यमाद्वारे ग्रामीण भागातील जनतेसाठी हा निर्णय जाहीर केला असता तर आज आलेल्या नागरिकांची हेळसांड झाली नसती अशा प्रतिक्रि या नागरिकांनी व्यक्त केल्या तसेच प्रादेशिक परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या हट्टापाई ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय व हेळसांड होत असल्याची प्रतिक्रि या अनेकांनी व्यक्त केली.
नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेल्या अनाठायी भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन सारथी प्रणाली सुरु असून, तेथे शिबिरे व इतर सर्व कामे वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत होत आहेत. नाशिक विभागाला अशी काय अडचण आहे, असा सवाल विचारला जात आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या १ आणि २ तारखेला शिबिराचे आयोजन करण्यात येत असे. आज पुनर्नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने आली होती. मात्र काम न झाल्यामुळे वाहनधारकांना परत जावे लागले. आता ट्रॅक्टर व इतर वाहने पुनर्नोंदणीसाठी नाशिक येथे परिवहन विभागाच्या मुख्यालयात घेऊन जावी लागणार आहेत. (वार्ताहर)